इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला खोमेनी म्हणतात भारत "अत्याचारी हुकूमशाह"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 03:37 PM2017-06-27T15:37:04+5:302017-06-27T15:37:04+5:30
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना शोषक आणि हुकूमशहांविरोधात काश्मीरी जनतेला साथ देण्याचं आवाहन केलं आहे
ऑनलाइन लोकमत
तेहरान, दि. 27 - इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना शोषक आणि हुकूमशहांविरोधात काश्मीरी जनतेला साथ देण्याचं आवाहन केलं आहे. सोमवारी करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये अयातुल्ला खोमेनी यांनी म्हटलं आहे की, ""मुस्लिम देशांनी बहारिन, काश्मीर, यमनसारख्या ठिकाणांना खुलं समर्थन दिलं पाहिजे. तसंच रमजानमध्ये हल्ला करणा-या शोषक आणि हुकूमशहांविरोधात आवाज उठवला पाहिजे"". भारत आणि इराणमध्ये चांगले मैत्रीपुर्ण संबंध राहिले आहेत. अशा परिस्थितीत अयातुल्ला खोमेनी यांनी काश्मीरचा उल्लेख करत मुस्लिम देशांचा मुद्दा उपस्थित करणं, तसंत अप्रत्यक्षरित्या भारताला शोषक म्हणणं भारताला आवडलेलं नाही. भारताकडून या वक्तव्याचा स्पष्ट शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
ईदच्या मुहूर्तावर करण्यात आलेल्या भाषणात अयातुल्ला खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. या सर्वांचा एकच शत्रू असल्याचंही ते यावेळी बोलले आहेत. अयातुल्ला खोमेनी यांनी सौदी अबर, सुन्नी अरब आणि भारताला एकाच पंक्तीत आणून बसवलं आहे.
Muslim world should openly support people of #Bahrain, #Kashmir, #Yemen, etc and repudiate oppressors& tyrants who attacked ppl in #Ramadan.
— Khamenei.ir (@khamenei_ir) June 26, 2017
काश्मीरमध्ये सध्या वातावरण चिघळलं असून याचवेळी अयातुल्ला खोमेनी यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वातावरण अजून चिघळलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Issues surrounding #Bahrain, #Yemen and various issues in other Muslim countries wound the Islamic body as a whole.
— Khamenei.ir (@khamenei_ir) June 26, 2017
अयातुल्ला खोमेनी यांचा काश्मीरचा उल्लेख करत मुस्लिमांचं लक्ष भारताकडे खेचण्याचा उद्देश असू शकतो. भारत आणि इराणमध्ये नेहमी मैत्रीपुर्ण संबंध राहिले आहेत. मात्र इराणचा भारताच्या बाबतीत नेहमीच संमिश्र दृष्टीकोन राहिला आहे. अनेक प्रकरणांमध्ये इराण तटस्थ राहिला आहे, तर अनेक वेळा त्यांनी भारतविरोधी प्रतिक्रिया दिली आहे.
काश्मीरचा उल्लेख करण्याचं दुसरं एक कारणं असण्याची शक्यता म्हणजे भारत आणि सौदी अरेबियामधील वाढते संबंध. दोन्ही देशांमधील मैत्रीपुर्ण संबंध चांगले होत असल्याने इराणने काश्मीरचा विषय काढला असण्याची शक्यता आहे. भारताचा सौदीकडे होत असलेला कल इराणच्या चिंतेचा विषय ठरत आहे. सध्याच्या घडीला दिल्ली आणि तेहरानदरम्यान सर्व काही आलबेल नाही. एका गॅस फिल्डवरुन दोघांमध्ये वाद सुरु आहे. त्यातच इराणमध्ये सुरु असलेल्या भारतातील काही मोठ्या प्रकल्पांवरील कामाची गती कमी झाली आहे.