37 हजार फूट उंचीवर दोन पायलट्स भिडले; प्रवाशांचा जीव टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 03:36 PM2018-07-30T15:36:09+5:302018-07-30T15:40:13+5:30
एअरलाईन्सकडून दोन्ही वैमानिकांचं निलंबन
बगदाद : विमान तब्बल 37 हजार फूट उंचीवर असताना फ्री स्टाईल हाणामारी करणाऱ्या दोन वैमानिकांना इराकी एअरवेजनं निलंबित केलं आहे. इराणहून इराकला जाणाऱ्या विमानाच्या दोन वैमानिकांमध्ये जुंपली होती. या विमानात 157 प्रवासी होते. वैमानिकांच्या हाणामारीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात होता. मात्र या प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.
विमानात झालेल्या हाणामारीबद्दल एका सहवैमानिकानं इराकी एअरवेजच्या व्यवस्थापनाला पत्र लिहिलं आहे. 'एअर हॉस्टेस माझ्यासाठी जेवण आणत होती. मात्र वैमानिकानं तिला जेवणाचा ट्रे आणू दिला नाही. त्यामुळे वैमानिकासोबतचा वाद वाढला. वैमानिकानं तिला जेवण आणण्याची परवानगी नाकारल्यानं हा संपूर्ण प्रकार घडला,' असं वैमानिकानं व्यवस्थापनाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. जेवण झाल्यावर वैमानिकानं मला धक्का दिला आणि अपमानित केलं, असंदेखील सहवैमानिकानं पत्रात म्हटलं आहे. यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. विमान सुरक्षितरित्या बगदादमध्ये पोहोचलं. मात्र लँडिंगनंतरही वैमानिकांमधील भांडण सुरूच होतं.
एअरवेजच्या व्यवस्थापनाला लिहिलेल्या पत्रात सहवैमानिकानं त्याची व्यथा मांडली. 'वैमानिकानं मला दोनदा मारलं आणि अपमानित केलं. त्यानंतर मी त्याला प्रत्युत्तर दिलं. कारण मला स्वत:चं रक्षण करायचं होतं,' असं सहवैमानिकानं पत्रात नमूद केलं आहे. सध्या इराकी एअरवेजच्या व्यवस्थापनाकडून दोन्ही वैमानिकांच्या दाव्यांची पडताळणी सुरू आहे. या दोघांवर आजीवन बंदी घातली जाऊ शकते, असं व्यवस्थापनानं म्हटलं आहे.