भारताविरुद्ध युद्धाचा इराकी बंडखोरांचा इशारा
By admin | Published: July 3, 2014 05:07 AM2014-07-03T05:07:12+5:302014-07-03T08:49:21+5:30
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (आयएसआयएस) या संघटनेचा कथित कमांडर इब्राहिम आवाद अल बद्री याने रमजाननिमित्त भाषण करताना अनेक देशांविरोधात युद्ध पुकारण्याची घोषणा केली
बगदाद : इराकमधील सुन्नी बंडखोरांच्या इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (आयएसआयएस) या संघटनेचा कथित कमांडर इब्राहिम आवाद अल बद्री याने रमजाननिमित्त भाषण करताना अनेक देशांविरोधात युद्ध पुकारण्याची घोषणा केली असून, त्यात भारताचेही नाव घेतले आहे.
आयएसआयने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या जाहीरनाम्यात भारताचा उल्लेख आल्याने इराकमध्ये सशस्त्र संघर्ष चाललेल्या भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अल बद्री म्हणजेच सुन्नी बंडखोरांचा नेता अबू बकर अल बद्री असून, त्याने रमजाननिमित्त केलेल्या भाषणात हे आवाहन केले आहे. अल बद्रीचे हे भाषण रशियन, इंग्रजी , फ्रेंच, अल्बानियन व अरेबिक भाषात उपलब्ध करण्यात आले आहे. जगातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचावे, असा हा इशारा आहे.
इराकमधील राजकीय नेत्यांना सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात अपयश आले असून, सुन्नी व कुर्द संसद सदस्य अनुपस्थित राहिल्याने नव्या सभापतींची निवड करणे शक्य झालेले नाही. सुन्नी बंडखोरांच्या हल्ल्यामुळे पंतप्रधान नूरी अल मलिकी यांना तिसरा कार्यकाळ मिळणे कठीण आहे. इराकमधील या संकटाने लाखो लोक बेघर झाले असून, इराक शिया, सुन्नी व कुर्द गटात विभागला गेला आहे. कुर्द सांसद नजीबा नजीब यांनी इराकी सरकारने स्वायत्त कुर्दचे बजेट मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)