इराकी बंडखोरांचे बगदादकडे कूच
By admin | Published: June 13, 2014 03:56 AM2014-06-13T03:56:12+5:302014-06-13T03:56:12+5:30
उत्तरेतील एक शहर ताब्यात घेतल्यानंतर बंडखोर गुरुवारी राजधानी बगदादकडे कूच करत असल्याने अमेरिका इराकी सुरक्षा दलांच्या मदतीसाठी हवाई हल्ल्यांचा विचार करत आहे.
किरकुक : उत्तरेतील एक शहर ताब्यात घेतल्यानंतर बंडखोर गुरुवारी राजधानी बगदादकडे कूच करत असल्याने अमेरिका इराकी सुरक्षा दलांच्या मदतीसाठी हवाई हल्ल्यांचा विचार करत आहे.
सुन्नी मुस्लिम इस्लामिक स्टेट आॅफ इराक व लेवँटचे (आयएसआयएल) बंडखोर सोमवारी सुरू झालेल्या या हल्ल्याचे नेतृत्व करत आहेत. धुलुइयाह शहर ताब्यात घेतल्यानंतर बंडखोरांनी गुरुवारी सकाळी बगदादकडे कूच केले. त्यांनी नजीकचा मुआतस्साम परिसरही ताब्यात घेतला आहे, असे प्रत्यक्षदर्शी व अधिकाऱ्यांनी सांगितले. आपले सदस्य बगदाद आणि शिया मुस्लिमांच्या पवित्र शहरांपैकी एक असलेल्या करबलावर चढाई करतील, असे आश्वासन आयएसआयएलचा प्रवक्ता मोहंमद अल अनदानी याने दिले असल्याचे जिहादी संकेतस्थळांवर जारी निवेदनात म्हटले आहे.
बंडखोर बगदादच्या दिशेने कूच करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नूरी अल मलिकी आणि राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या आणीबाणी जाहीर करण्याच्या विनंतीवर विचार करण्यासाठी संसदेचे आज आपत्कालीन सत्र बोलावण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)