श्रीलंकेनंतर आता इराक, आंदोलकांचा संसदेवर ताबा; मुत्सद्यांच्या घरातही शिरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 08:34 AM2022-07-28T08:34:23+5:302022-07-28T08:34:48+5:30
इराकचे कार्यकारी पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी आंदोलकांना शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे.
इराकमध्ये आता श्रीलंकेप्रमाणे आंदोलन सुरू झालं आहे. बुधवारी शेकडो संतप्त आंदोलकांनी बगदादमधील संसद भवनावर ताबा मिळवला. अल जझीराच्या वृत्तानुसार, बहुतांश आंदोलक हे इराकी शिया नेते मुक्तदा अल-सद्र यांचे समर्थक आहेत. माजी मंत्री आणि माजी प्रांतीय गव्हर्नर मोहम्मद शिया अल-सुदानी यांना इराण-समर्थित पक्षाने पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दिल्याचा निषेध करण्यात येत आहे.
आंदोलकांनी बुधवारी बगदादमधील उच्च सुरक्षा असलेल्या ग्रीन झोन, सरकारी भवन आणि मुत्सद्दींच्या घरांमध्ये प्रवेश केला. यानंतर सर्व आंदोलक हे संसदेतही शिरले. परंतु त्यावेळी संसदेत कोणी उपस्थित नव्हतं. अल जझीराच्या रिपोर्टनुसार त्यावेळी संसदेत केवळ सुरक्षारक्षक उपस्थित होते.
यावेळी आंदोलकांच्या हातात शिया नेता अल सदर यांचे फोटोही होते. पोलिसांनी पहिले सीमेंटच्या भिंती पाडणाऱ्या आंदोलकांवर वॉटर कॅननचा वापर केला. आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलीस मुख्य गेटवर तैनात करण्यात आले होते. दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी तयार केलेली सीमेंटची भिंतही तोडली. यानंतर त्यांनी अल सुदानी, आऊट अशी घोषणाबाजीही केली. अनेक शहरांतून या ठिकाणी आंदोलक जमले होते.
दरम्यान, यानंतर इराकचे कार्यकारी पंतप्रधान अल कदीमी यांनी आंदोलकांना ग्रीन झोन तात्काळ रिकामा करण्याचं आवाहन केलं. तसंच इराशा देत सुरक्षा दल राज्य संस्थान आणि परदेशी कार्यालयांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक आवश्यक ती पावलं उचलतील असंही म्हटलं.