आयरिश लेखक पॉल लिंच यांना 2023 चा 'बुकर पुरस्कार'; 'या' कादंबरीसाठी झाला सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:43 PM2023-11-27T12:43:01+5:302023-11-27T12:48:43+5:30
भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारू याही होत्या पुरस्काराच्या दावेदार
Paul Lynch wins Booker Prize 2023: आयरिश लेखक पॉल लिंच यांना लंडनमध्ये 2023 चा बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या 'प्रोफेट सॉन्ग' या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. लंडनस्थित भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारू याही या पुरस्काराच्या दावेदार होत्या. 'वेस्टर्न लेन' ही कादंबरी त्यांनी लिहिली आहे. 46 वर्षीय लिंच यांच्या 'प्रोफेट सॉन्ग' या कादंबरीत आयर्लंडच्या निरंकुशतेचे चित्र दिसते. ओल्ड बिलिंग्जगेट, लंडन येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात श्रीलंकेच्या लेखक शेहान करुणाथिलाका यांच्या हस्ते लिंच यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'द सेव्हन मून ऑफ माली आल्मेडा'साठी करूणाथिलाका यांना गेल्या वर्षी बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
"मी आधुनिक अराजकतेकडे पाहण्याचा प्रयत्न करत होतो", असे ते म्हणाले. पुरस्कारात लिंच यांना £50,000 इनाम जिंकल्यानंतर लिंच म्हणाले की, मी पाश्चात्य लोकशाहीतील अशांततेकडे पाहण्याचा प्रयत्न केला. सीरियाची समस्या, निर्वासित संकटाचे प्रमाण आणि पाश्चिमात्य देशांची उदासीनता यावर मी लिखाण केले.' लिंच हा पुरस्कार जिंकणारी पाचवी आयरिश लेखिका ठरली आहे. याआधी आयर्लंडच्या आयरिस मर्डोक, जॉन बॅनविले, रॉडी डॉयल आणि अॅन एनराइट यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला होता.
कादंबरी एका भयानक नवीन जगाशी झुंजत असलेल्या एका कुटुंबाची कथा सांगते ज्यामध्ये लोकशाही मानदंड नाहीसे होऊ लागतात. केनियात जन्मलेल्या चेतना मारू यांचाही या वर्षीच्या पुरस्कारासाठी चर्चेत असलेल्या सहा लेखकांमध्ये समावेश होता. मारू यांची 'वेस्टर्न लेन' ही कादंबरी ब्रिटिश गुजराती वातावरणावर आधारित आहे. बुकर पारितोषिक विजेत्याची निवड करणार्या गटाच्या सदस्यांनी कादंबरीमध्ये स्क्वॅशच्या खेळाचा वापर गुंतागुंतीच्या मानवी भावनांचे रूपक म्हणून केल्यामुळे कौतुक झाले आहे.
कोण होते दावेदार?
याशिवाय सारा बर्नस्टीनची कादंबरी 'स्टडी फॉर ओबेडिअन्स', जोनाथन एस्कोफरीची 'इफ आय सर्व्हायव्ह यू', पॉल हार्डिंगची 'द अदर ईडन' आणि पॉल मरेची 'द बी स्टिंग' या वेळी पुरस्कारासाठी दावेदार होत्या. पुरस्काराच्या अंतिम यादीत स्थान मिळविणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास £2,500 दिले जातील.