इमरान खान अन् बुशरा बीबी यांचा निकाह बेकायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 09:28 AM2023-07-17T09:28:14+5:302023-07-17T09:28:59+5:30

क्रिकेटमधील आपल्या अलौकिक कामगिरीनं त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली

Is Imran Khan and Bushra Bibi's marriage illegal? | इमरान खान अन् बुशरा बीबी यांचा निकाह बेकायदा?

इमरान खान अन् बुशरा बीबी यांचा निकाह बेकायदा?

googlenewsNext

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रमुख इमरान खान यांच्यामागचं शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. एकामागोमाग एक आरोपांच्या फैरींना त्यांना समोरं जावं लागतं आहे. अनेक गुन्ह्यांसंदर्भात त्यांच्यावर तब्बल १४३ खटले भरण्यात •आले आहेत. कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते आणि तुरुंगात जावं लागू शकतं, या भीतीची टांगती तलवार अखंड त्यांच्या मानेवर आहे. त्याचा एक एपिसोडही नुकताच होऊन गेला आहे. त्यांच्या जिवाला असलेला धोका तर त्यांच्यासहित प्रत्येकाला चांगलाच ठाऊक आहे.

क्रिकेटमधील आपल्या अलौकिक कामगिरीनं त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. १९९२ मध्ये पाकिस्तानला क्रिकेट वर्ल्डकप जिंकून दिल्यानंतर तर त्यांच्या लोकप्रियतेनं शिखर गाठलं. लोकांनी त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं आणि पाकिस्तानी जनतेसाठी ते मसिहा ठरले. 'द किंग ऑफ स्विंग', 'लायन ऑफ लाहोर', 'द फायटर जेट'... यासारख्या अनेक टोपणनावांनी आजही ते परिचित आहेत. क्रिकेटच्या मैदानात तर फायटर होतेच; पण राजकारणातही 'फायटर' हीच त्यांची इमेज आहे. क्रिकेट, राजकारणात त्यांना जशी 'फाइट' करावी लागली, तशीच वैयक्तिक आयुष्यातही. त्यांचं वैयक्तिक आयुष्यही कायम वादळी राहिलं. इमरान यांची अनेक प्रेमप्रकरणं, त्यांचे तीन अधिकृत विवाह, त्यांचे घटस्फोट, त्यांची मुलं, त्यातल्या काहींना त्यांनी दिलेला औरस मुलांचा दर्जा, तर काहींच्या बाबतीत कानावर ठेवलेले हात... एक ना अनेक... इमरान है कायम पाकिस्तानच्या जनतेसाठी आणि माध्यमांसाठी चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात तर पाकिस्तानी जनतेला कमालीचा रस आहे. त्यांचं हे वैयक्तिक आणि खासगी आयुष्य त्यांच्यासाठी बऱ्याचदा त्रासदायकही ठरलं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान असताना त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनी 'कमिशन एजंट' म्हणून कसं काम केलं आणि आपल्या परचितांना, नातेवाइकांना मोठमोठी कंत्राटं कशी मिळवून दिली, पैशाचा अखंड स्रोत त्यांच्याकडेच सुरू राहील यासाठी त्यांनी काय काय केलं, देश-विदेशातून मिळालेली मौल्यवान गिफ्ट्स स्वतःसाठी कशी वापरली ती विकून फुकून त्याचा पैसा कसा केला. याबाबतच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा तर पाकिस्तानी जनतेला चघळण्यासाठी जणू जीवन मरणाचा प्रश्न बनला आहे.
आता इमरान यांच्यापुढची नवी डोकेदुखी म्हणजे खुद्द त्यांचा स्वत:चा आणि बुशरा बीबी यांचा निकाह! हा निकाह 'कायदेशीर' आहे की नाही याबाबतचा वाद आता कोर्टात गेला आहे. हा किस्साही मोठा मजेदार आहे. इमरान खान यांनी बुशरा बीबी यांच्यासोबत केलेला निकाह म्हणजे त्यांचे तिसरे लग्न.
बुशरा बीबी यांचा याआधी खावर मनेका यांच्यासोबत निकाह झाला होता. त्यांना पाच मुलंही झाली. नोव्हेंबर २०१७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर काही दिवसांतच २०१८ च्या सुरुवातीला बुशरा बीबी आणि इमरान खान यांचा निकाह झाला; पण या निकाहमध्ये शरिया कायद्याचं उल्लंघन झालं आणि इस्लामिक रीतीरिवाजांचं पालन करण्यात आलं नाही, असा आरोप इमरान यांच्यावर करण्यात आला आहे. मुस्लीम रीतीरिवाजांनुसार कोणत्याही मुस्लीम महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर किंवा तिच्या पतीचं निधन झाल्यानंतर तिला जर पुनर्विवाह करायचा असेल तर त्यासाठी 'इद्दताचा ठरावीक कालावधी पूर्ण करावा लागतो. त्यानंतरच या महिलेला पुनर्विवाह करता येतो. इद्दतचा कालावधी नेमका किती, याबाबत वेगवेगळे नियम आहेत. घटस्फोट झाल्यानंतर किंवा पतीचं निधन झाल्यानंतर जर बाळाचा जन्म झाला, तर त्याबाबत कोणतीही संदिग्धता राहू नये यासाठी विशेषकरून हा नियम आहे. पतीनं तलाक दिला असेल, पतीचा मृत्यू झाला असेल किंवा पतीचं निधन झाल्याच्या वेळी पत्नी गर्भवती असेल... अशा विविध कारणांसाठी इद्दतचा कालावधी वेगवेगळा असतो. बुशरा बीबीचा तलाक झाल्यानंतर इमरान यांच्याबरोबर पुनर्विवाह करताना नेमका हाच इद्दतचा कालावधी पाळण्यात आला नाही आणि तो संपण्याआधीच त्यांनी निकाह केला, असा त्यांच्यावर आरोप आहे. मोहम्मद हनीफ यांनी यासंर्भात दाखल केलेली याचिका कोर्टानं दाखल करून घेतल्यानं इमरान यांच्यापुढील संकटयादीत वाढ झाली आहे.

'आज'च निकाह केला तर पंतप्रधान व्हाल!
इमरान आणि बुशरा बीबी यांचा निकाह लावून दिला, त्या मौलवी मुफ्ती मोहम्बद सईद यांचंही म्हणणं आहे. यासंदर्भात मी बुशरा बीबी यांच्या नातेवाइकांकडे संपूर्ण चौकशी केली होती, या निकाहमध्ये इस्लामिक परंपरांचं पालन करण्यात आलेले नाही. या निकाहमधलं आणखी एक गौडबंगाल म्हणजे, याच दिवशी जर निकाह केला. तुम्हाला पंतप्रधानपदाची संधी आहे, असं इमरान यांना सांगण्यात आलं होतं म्हणे!

Web Title: Is Imran Khan and Bushra Bibi's marriage illegal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.