जगात आणखी एका युद्धाची घंटा? किम जोंग यांची दक्षिण कोरियावर हल्ला करण्याची योजना?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 02:40 PM2024-02-19T14:40:17+5:302024-02-19T14:41:09+5:30
Kim Jong Un : किम जोंग उन यांनी स्पष्ट केले होते की, उत्तर कोरियाला युद्धाची इच्छा नाही, पण त्यापासून मागे हटणार नाही. युद्ध सुरू झाल्यावर दक्षिण कोरिया ताब्यात घेणे हे आपले ध्येय आहे.
Kim Jong Un : (Marathi News) युक्रेन-रशिया युद्ध आणि गाझामधील इस्रायल-हमास संघर्षादरम्यान आता जगाचे लक्ष उत्तर कोरियाकडे लागले आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्या अलीकडील हालचालींमुळे त्यांच्या लष्करी महत्त्वाकांक्षेवर एक नवीन वादविवाद सुरू झाला आहे, ज्यामध्ये त्यांनी दक्षिण कोरियाशी समेट किंवा पुन्हा एकत्र येण्याबद्दलच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
केसीएनएच्या रिपोर्टनुसार, नुकत्याच झालेल्या एका राजकीय कार्यक्रमात किम जोंग उन यांनी स्पष्ट केले होते की, उत्तर कोरियाला युद्धाची इच्छा नाही, पण त्यापासून मागे हटणार नाही. युद्ध सुरू झाल्यावर दक्षिण कोरिया ताब्यात घेणे हे आपले ध्येय आहे. उत्तर कोरियाच्या अलीकडील अत्याधुनिक आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे किम जोंग उन यांच्या राजकीय आणि लष्करी महत्त्वाकांक्षांना बळ मिळाले आहे. किम जोंग उन सातत्याने आपली लष्करी शक्ती वाढवत आहे. किम जोंग उन यांच्या धोकादायक योजनांबाबत आंतरराष्ट्रीय समुदाय तणावात आहे.
सांगजी विद्यापीठातील लष्करी अभ्यासाचे प्राध्यापक चोई गि-इल यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात आता युद्ध होण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाने भविष्यात कोणतेही प्रक्षोभक कृत्य केल्यास मोठ्या प्रमाणात नागरिक आणि लष्करी जवानांचे बळी जाऊ शकतात. अशा स्थितीत दक्षिण कोरिया हवाई हल्ले करू शकतो.
दरम्यान, दक्षिण कोरिया आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील संघर्षामुळे किम जोंग उन यांना आपल्या राजवटीला असलेल्या अस्तित्वाच्या धोक्याची जाणीव आहे. याशिवाय, ते थेट युद्धात न जाता तणाव वाढवण्याच्या तयारीचे संकेत देत आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे. क्यूंगनाम विद्यापीठाच्या सुदूर पूर्व अभ्यास संस्थेच्या युल-चुल लिम यांच्या मते, तणावपूर्ण वातावरणामुळे गैरसमज आणि अपघाती संघर्ष होण्याची शक्यता जास्त आहे.
किम जोंग उन यांनी दिला होता 'हा' इशारा
नुकतेच, जमिनीवरून समुद्रात मारा करणाऱ्या नवीन क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या वेळी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी असा इशारा दिला की, त्यांचा देश प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियासोबतच्या विवादित सागरी सीमांवर अधिक आक्रमक लष्करी भूमिका घेईल.