हा माउंट फुजी आहे की एसटीचे स्टॅन्ड?; शिखरावरील गर्दी आटोक्यात आणण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 07:36 AM2023-09-20T07:36:15+5:302023-09-20T07:36:36+5:30

यंदाचा माउंट फुजी चढाईचा हंगाम जुलै महिन्यात सुरू झाला आणि अवघ्या दोन महिन्यांतच ६५,००० गिर्यारोहकांनी शिखर सर करण्याचा प्रयत्न केला.

Is this Mount Fuji or ST's stand?; Advise to manage peak congestion | हा माउंट फुजी आहे की एसटीचे स्टॅन्ड?; शिखरावरील गर्दी आटोक्यात आणण्याचा सल्ला

हा माउंट फुजी आहे की एसटीचे स्टॅन्ड?; शिखरावरील गर्दी आटोक्यात आणण्याचा सल्ला

googlenewsNext

वाटेत लोकांची गर्दी झालीये.. आजूबाजूला कचराच कचरा झालाय... असं दृश्य कुठे बरं दिसेल ? रस्त्यावर किंवा एखाद्या सार्वजनिक बागेत ?- नाही, हे दृश्य आहे जपानमधल्या सर्वात उंच शिखरावरचं. माउंट फुजीवरचं. गिर्यारोहक म्हटलं की त्यांचा विशिष्ट पोशाख, पायात विशिष्ट बूट हे येतंच; पण माउंट फुजीवर साध्या कपड्यातले, पायात साध्या चपला घालून आलेली माणसंही दिसतात. ही माणसं गिर्यारोहक कशी बरं असतील ? असा प्रश्न कोणालाही पडेल; पण माउंट फुजी शिखरावरच्या उतारावर गस्त घालणाऱ्या मिहो सकुराई यांच्यासाठी हे दृश्य आता नित्याचं झालं आहे. गेल्या सात वर्षांपासून ते फुजी शिखराच्या उतारावर गस्त घालण्याचं काम करतात; पण गेल्या दोन वर्षांपासून त्यांना या भागात झालेला बदल स्पष्टपणे दिसू लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून अनुभवी गिर्यारोहक, माउंट फुजी शिखराच्या पर्यावरणाचे रक्षक यांना माउंट फुजीच्या वेदना स्पष्टपणे ऐकू यायल्या लागल्या आहेत.

माउंट फुजी हे १२,३८८ फूट उंच शिखर. त्यावर १० हायकिंग स्टेशन्स आहेत. २०१२ मध्ये माउंट फुजीच्या ५ व्या हायकिंग स्टेशनवर २ लाख लोकांची गर्दी होती. हाच आकडा २०१९ नंतर ५ लाख इतका झाला आहे. २०१३ मध्ये माउंट फुजीला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. तेव्हाच युनोस्कोच्या सल्लागार समितीने या शिखरावरील गर्दी आटोक्यात आणण्याचा सल्ला येथील प्रांतीय सरकारला दिला होता; पण कोरोनानंतरच्या लोकांच्या पर्यटन उत्साहाने माउंट फुजीचा श्वासही आता कोंडला आहे. 

यंदाचा माउंट फुजी चढाईचा हंगाम जुलै महिन्यात सुरू झाला आणि अवघ्या दोन महिन्यांतच ६५,००० गिर्यारोहकांनी शिखर सर करण्याचा प्रयत्न केला. २०१९ पासून आतापर्यंत माउंट फुजीवरील गिर्यारोहकांची संख्या १७ टक्क्यांनी वाढली आहे. अति पर्यटनामुळे शिखरावरील लोकांची गर्दी वाढली, कचरा वाढला, कार्बनडाय ऑक्साइडच्या उत्सर्जनाचं प्रमाणही वाढलं. बेशिस्त गिर्यारोहकांमुळे माउंट फुजीचं पर्यावरण ढासळत चाललं आहे. माउंट फुजीच्या मध्यावर या शिखराचं पाचवं हायकिंग स्टेशन येतं. ते गोगोम नावानं ओळखलं जातं. या जागेवरुन सूर्यास्त खूप सुंदर दिसतो. तो पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढते आहे. येथे पोहोचायला गिर्यारोहक असण्याची गरज नाही. टोकियोवरुन बस / गाडी / इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये बसलात की थेट माउंट फुजीच्या या पाचव्या स्टेशनवर पोहोचता येतं. केवळ सूर्यास्ताची मजा घेण्यासाठी जमलेली गर्दी मग गांभीर्याने माउंट फुजीचे शिखर पार करणाऱ्यांसाठी मात्र अडचणीची होते.

जपानमध्ये राष्ट्रीय उद्याने, जागतिक वारसा स्थळ असा दर्जा मिळालेल्या जागी प्रवेश बंदी नाही; पण माउंट फुजीवरील गिर्यारोहणाचा दर्जा राखण्यासाठी आता या शिखरावर दर दिवसाला ४,००० जणच चढाई करू शकतील अशी मर्यादा घालण्यात आली आहे. माउंट फुजीच्या पाचव्या हायकिंग स्टेशनवर पोहोचणाऱ्या लोकांना अटकाव करण्यासाठी मात्र विशिष्ट कायद्याची गरज असल्याची जाणीव प्रशासनाला होऊ लागली आहे. बसऐवजी शिखराच्या हायकिंग स्टेशनवर पोहोचण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करावी आणि विशिष्ट वेळेलाच रेल्वे सोडल्या तर माउंट फुजीवर केवळ पर्यटक म्हणून येणाऱ्यांची गर्दी कमी होईल, असं माउंट फुजीचं शिखर गाठणारे यशस्वी गिर्यारोहक सांगतात.

टोकियोवरुन माउंट फुजीवरील प्रसिद्ध गोगोम या हायकिंग् स्टेशनच्या टोकावर पोहोचताना वाटेत लावलेल्या सेन्सरला वाहनांच्या चाकांचा स्पर्श झाला की माउंट फुजीवरील लोकगीत ऐकू येतं. हे गीत १९११ मध्ये साझानामी इवाया यांनी लिहिलं आहे. या गीतातून माउंट फुजीच्या भव्यतेचं गुणगान केलंय. या शिखराचे टोक कसं आकाशातल्या ढगांवर रेललेलं आहे हे कौतुकानं सांगितलं आहे. माउंट फुजीची ही भव्यता विलुप्त तर होत नाही ना अशी भीती आता माउंट फुजीच्या चढाईवर मनापासून प्रेम करणाऱ्या गिर्यारोहकांनाही वाटू लागलीये. म्हणूनच ते आता या माउंट फुजीच्या वेदनेच्या हाका ऐका असं जगाला सांगू लागले आहेत. 

बुलेट क्लायबिंगचं घातक पेव

शिखराच्या टोकाचा ध्यास घेतलेले, त्यासाठी वर्षानुवर्षे तयारी करणारे गिरीप्रेमी एकीकडे आणि एका रात्रीत चढाई करण्यासाठी शिखरावर पाऊल ठेवणारे बुलेट क्लाइंबर एकीकडे बुलेट क्लाइंबर रात्री शिखर चढ करायला सुरुवात करतात आणि पहाटेपर्यंत चढाई करतात; इथल्या वातावरणाशी परिचय न झाल्यानं अनेकांना वर जाताना अॅल्टिटूड सिकनेस (उंचावरचा आजार जाणवू लागतो. या क्लायंबरना चढाईच्या वाटेचे नियम ठाऊक नसतात. त्यामुळे बेजबाबदार वागून स्वतःचा जीव तर धोक्यात घालतातच शिवाय गांभीर्याने चढाई करणाऱ्यांनाही अडथळे आणतात.

Web Title: Is this Mount Fuji or ST's stand?; Advise to manage peak congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.