जेव्हा न्यूटनला करावं लागलं होतं 'वर्क फ्रॉम होम'; झाला होता सर्वात मोठा साक्षात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:23 PM2020-03-16T18:23:24+5:302020-03-16T18:33:03+5:30
साडेतीनशे वर्षांपूर्वी लंडनमध्ये आली होती प्लेगची साथ; अनेकांना बसला होता फटका
मुंबई: सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलंय. कोरोनाचं संसर्ग अतिशय वेगानं होत असल्यानं अनेकांच्या मनात भीती निर्माण झालीय. जगभरातल्या अनेक देशांनी शाळा, महाविद्यालयं बंद केली असून काही ठिकाणी वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. अनेक मोठ्या आणि प्रतिष्ठीत कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. साडे तीनशे वर्षांपूर्वी लंडनमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे जगात मोठा चमत्कार घडला होता.
१६६५ मध्ये लंडनमध्ये प्लेगची साथ आली होती. प्लेगची लागण झाल्यानं अनेकांना प्राण गमवावा लागला. त्यावेळी आयझॅक न्यूटन ट्रिनिटी महाविद्यालयात शिकत होते. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसारखीच अवस्था त्यावेळी निर्माण झाली होती. न्यूटन त्यावेळी विशीत होते. प्लेगचा संसर्ग अतिशय वेगात होत असल्यानं त्यावेळीही प्रशासनानं नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय संसर्ग झालेल्या अनेकांना क्वॉरेंटाईन (विलगीकरण) करण्यात आलं.
प्लेगमुळे महाविद्यालयं बंद करण्यात आल्यानं न्यूटन घरी परतले. त्यामुळे न्यूटन त्यांच्या वूलस्टोर्प मनोरमधल्या त्यांच्या घरी परतले. घरी परतल्यानंतरही न्यूटन यांचं संशोधन सुरूच होतं. यावेळीच त्यांनी गुरुत्वाकर्षावर काम केलं. वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन दैनिकानं न्यूटन यांनी प्लेगच्या काळात केलेल्या संशोधनावर एक विशेष लेख प्रसिद्ध केलाय. त्यात गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर न्यूटन यांनी प्लेगची साथ आलेल्या दिवसांतच काम केल्याचा उल्लेख आहे.
प्लेगमुळे महाविद्यालय बंद असल्यानं न्यूटन त्यांच्या घरी परतले होते. त्यावेळी एका उद्यानात निवांत बसले असताना ते गुरुत्वाकर्षण शक्तीवर विचार करत होते. गुरुत्वाकर्षण केवळ पृथ्वीपासून काही अंतरापर्यंत मर्यादीत नाही, तर ते चंद्रापर्यंत असावं, हा विचाप याच काळात न्यूटन यांच्या डोक्यात पहिल्यांदा आला. यानंतर एप्रिल १६६७ मध्ये महाविद्यालयात परतले.