इशरत जहाँ लष्करची दहशतवादी, मोदी होते निशाण्यावर - डेव्हिड हेडली

By admin | Published: February 11, 2016 08:43 AM2016-02-11T08:43:46+5:302016-02-11T14:02:32+5:30

२००४ साली पोलिसांच्या चकमकीत मारली गेलेली इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी होती व अक्षरधाम मंदिर आणि नरेंद्र मोदी तिच्या निशाण्यावर होते असा धक्कादायक खुलासा हेडलीने केला.

Ishrat Jahan was a terrorist, Modi was on target - David Headley | इशरत जहाँ लष्करची दहशतवादी, मोदी होते निशाण्यावर - डेव्हिड हेडली

इशरत जहाँ लष्करची दहशतवादी, मोदी होते निशाण्यावर - डेव्हिड हेडली

Next
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ -   '२००४ साली चकमकीत मारली गेलेली मुंब्र्यातील इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित हस्तक आणि सुसाईड बॉम्बर होती', अशी धक्कादाक कबुली मुंबईवरील भीषण हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला डेव्हिड हेडलीने दिली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई न्यायालयासमोर गुरूवारी साक्ष देताना हेडलीने इशरत जहाँबद्दलचा हा गौप्यस्फोट केला. 
' इशरत जहाँ ही लष्करची दहशतवादी आणि महिला विंगेची सुसाईड बॉम्बर होती. कोणत्या तरी एका नाक्यावर पोलिसांना मारण्याचा कट होता, त्यात ती सामील होती. तेच गुजरातमधील अक्षरधाम मंदिर उडवणे आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मारण्याची जबाबदारीही तिला देण्यात आली होती' असे महत्त्वपूर्ण खुलासे हेडलीने केले आहेत. 
लष्कर-ए-तोयबाची सदस्या असल्याच्या कारणावरून गुजरात पोलिसांनी मुंब्र्याची रहिवासी असलेल्या १९ वर्षीय इशरत जहाँ हिला २००४ साली झालेल्या चकमकीत ठार केले होते. तिच्यासोबत आणखी तिघांनाही दहशतवादी असल्याच्या संशयावरून ठार करण्यात आले होते. या चकमकीवरून देशभरात गदारोळ माजला होता, मात्र आज हेडलीने केलेल्या खुलाशानंतर इशरत जहाँ दहशतवादी असल्याच्या आरोपावर एकाप्रकारे शिक्कामोर्तबच झाले. 
बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने हेडलीची साक्ष नोंदविता आली नव्हती. त्यानंतर आज (गुरूवार) सकाळी हेडलीची साक्ष पुन्हा एकदा सुरू झाली. या साक्षीत त्याने अनेक महत्वपूर्ण खुलासे केले. 
'मुंबई हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबा व आयएसआयने पैसा पुरविल्याचा खुलासा हेडलीने केला आहे. मुंबईला येण्याआधी मला मेजर इक्बाल, साजिद मीर आणि तहव्वूर राणा यांच्याकडून बरेच पैसे मिळाले होते. तसेच २६/११ हल्ल्यापूर्वी तहव्वूर राणा भारतात आला होता. पण तो अडचणीत सापडू नये म्हणून मीच त्याला अमेरिकेला जाण्याचा सल्ला दिला होता' असेही हेडलीने कबूल केले. 
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधीची माहिती हेडली व्हिडिओ कॉन्फरन्सने विशेष न्यायालयाला देत आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय ही लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक आणि लष्करी साहाय्य करीत असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारच्या सुनावणीदरम्यान हेडलीने न्यायालयाला दिली होती. 
विशेष न्यायालयाने १० डिसेंबर २०१५ रोजी हेडलीला माफीचा साक्षीदार केले आणि ८ फेब्रुवारी रोजी साक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ८ फेब्रुवारीपासून हेडलीची साक्ष नोंदवण्यास सुरुवात करण्यात आली. डेन्मार्क आणि मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी हेडली याला अमेरिकेच्या न्यायालयाने ३५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
 
 
माझी बहीण निर्दोष - मुसरत जहाँ
 
माझी बहीण इशरत निर्दोष होती आणि हे सत्य कधी ना कधी समोर येईलच, अशी प्रतिक्रिया इशरत जहाँची बहीण मुसरतने व्यक्त केली. तसेच हेडली हा एक दहशतवादी असल्याने त्याच्या वक्तव्यावर विश्वास कसा ठेवायचा असा सवालही तिने विचारला. आमचा कायद्यावर विश्वास असून आम्ही कायदेशीर मार्गानेच लढाई लढू असेही तिने स्पष्ट केले.
 
हेडलीच्या आज साक्षीतील महत्वपूर्ण खुलासे :
- मुंबईतील ताडदेव एसी मार्केट परिसरात मी १४ सप्टेंबर २००६ मध्ये एक ऑफीस उघडले. ११ ऑक्टोबर २००६ मध्ये डॉ. तहव्वूर राणाने मला ६६ हजार ६०५ रुपये दिले. तर पुढच्याच महिन्यात म्हणजे ७ नोव्हेंबरला त्याने मला ५०० अमेरिकन डॉलर दिले .
- ३० नोव्हेंबरला १७,६३६ आणि ४ डिसेंबरला १००० यूएस डॉलर तहव्वूरने दिले. ते सर्व पैसे पैसा नरिमन पॉईंट येथील इंडसइंड बँकेतील खात्यातून ताब्यात घेतले. 
- मी मुंबईत येण्यापूर्वी मेजर इक्बालने मला २५ हजार डॉलर्स आणि साजिद मीरने ४० हजार पाकिस्तानी चलन दिले. तसेच एप्रिल २००८ मध्ये मला २००० तर जून महिन्यात १५०० रुपये देण्यात आले. अब्दुल रेहमान पाशानेही मला १८,००० रुपये दिले.
-  मुंबई २६/११ हल्ला : मुंबईवरील हल्ल्यापूर्वी तहव्वूर राणा मुंबईत आला होता. पण तो कोणत्याही संकटात सापडू नये म्हणून मी त्याला अमेरिकेला परत जाण्याचा सल्ला दिला.
- २००६ ते २००९ या काळात भारतभेटीदरम्यान मी २- ३ मोबाईल नंबर्स वापरले. 
- इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित सुसाइड बॉम्बर होती. गुजरातमधील अक्षरधाम मंदिर उडविण्याचे आणि नरेंद्र मोदी यांना मारण्याचे टार्गेट इशरतला देण्यात होते. 
 

Web Title: Ishrat Jahan was a terrorist, Modi was on target - David Headley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.