आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध, पाकिस्तानच्या लष्करानेच दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 11:29 AM2017-10-06T11:29:23+5:302017-10-06T11:30:55+5:30
गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची कबुली स्वत: पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, याचा अर्थ त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे असा होत नाही असं पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहे.
इस्लमाबाद - गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची कबुली स्वत: पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, याचा अर्थ त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे असा होत नाही असं पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहे. यासोबतच बंदी घालण्यात आलेल्या जमात-उद-दावाने पाठिंबा दिलेला राजकीय पक्ष मिल्ली मुस्लिम लीग निवडणूक लढण्यासाठी स्वतंत्र आहे असंही पाकिस्तान लष्कराने स्पष्ट केलं आहे.
मिल्ली मुस्लिम लीगला मुंबई 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या जमात-उद-दावाने पाठिंबा दिला असून गेल्या महिन्यात पोटनिवडणूक लढण्यासाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. निवडणूक आयोगाने मिल्ली मुस्लिम लीग राजकीय पक्ष असल्याचं अमान्य करत निवडणूक लढण्याची परवानगी दिली नव्हती.
पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते. अमेरिकेच्या संसदेत याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस आणि अमेरिकेच्या परराष्ट्र संबंधातील जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी उत्तर दिले. त्यात त्यांनी आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असून त्यांचे परराष्ट्र धोरण आहे. ते पाकिस्तान सरकारला जुमानत नाहीत असे स्पष्ट केले होते.
अमेरिकेच्या दाव्यासंबंधी आयएसआयचे महासंचालक मेजर जनरल आसिफ गफूर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, 'संबंध असणे आणि पाठिंबा असणे यामध्ये फरक आहे. दहशतवाद्यांशी संबंध नसलेल्या एका गुप्तचर यंत्रणेचं नाव सांगा. संबंध सकारात्मकदेखील असू शकतात, आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी कुठेही पाठिंबा असल्याचा उल्लेख केलेला नाही'.
रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना भारताच्या कारवायांमुळे पाकिस्तानची पुर्वेकडील सीमारेषा असुरक्षित असल्याचा दावा केला आहे. भारताने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे 222 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. हा आकडा आतापर्यंत झालेल्या कोणत्याही वर्षातील उच्चांक आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. 'पण आम्ही दिलेल्या उत्तरामुळे भारतालाही किंमत चुकवावी लागली आहे. पण जर भारत संयमाने वागला नाही तर आम्ही उत्तर देत राहू', असा इशारा त्यांनी दिला आहे.
'आम्ही शांतताप्रिय देश असून आम्हाला भारतासोबत युद्ध करायचे नाही. पण आम्ही आमचं रक्षण करु शकतो आणि त्यासाठी सक्षम आहोत', असं आसिफ गफूर बोलले आहेत. 'युद्ध हा पर्याय नसून ते होऊ नये यासाठी आम्ही सर्व पाय-यांवर चर्चा करत आहोत', असं आसिफ गफूर यांनी यावेळी सांगितलं.