इसिस व अल-काईदात चढाओढ
By admin | Published: November 22, 2015 03:04 AM2015-11-22T03:04:15+5:302015-11-22T03:04:15+5:30
गेल्या काही दिवसांतील दहशतवादी हल्ले पाहता वर्चस्वासाठी इसिस आणि अल-काईदा यांच्यात तीव्र स्पर्धा झाल्याचे दिसून येत असून, त्यात निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत.
बैरूत : गेल्या काही दिवसांतील दहशतवादी हल्ले पाहता वर्चस्वासाठी इसिस आणि अल-काईदा यांच्यात तीव्र स्पर्धा झाल्याचे दिसून येत असून, त्यात निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत.
अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अल-कायदा ही संघटना प्रकाशात आली आणि गेल्या १४-१५ वर्षांत याच संघटनेचा बोलबाला होता; पण इराकमध्ये ‘इसिस’चा उदय झाल्यापासून गेल्या दोन वर्षांपासून अल-कायदा मागे पडल्यासारखे वाटत होते. त्यातून आता दोन्ही संघटनांचा वर्चस्वासाठी लढा असल्याचे दिसते.
इसिसने इराक आणि सिरियाच्या काही भागात भयंकर नरसंहार करून जगभर दहशत निर्माण केली आहे. त्यातच तीन आठवड्यांपूर्वी २२४ प्रवासी असलेले रशियन विमान दुर्घटनाग्रस्त झाले. ते आपणच पाडल्याचा दावा ‘इसिस’ने केला आणि शेवटी तो खरा ठरला.
त्यानंतर काही दिवसांतच गेल्या आठवड्यात फ्रान्सची राजधानी पॅरिसवर हल्ला करून ‘इसिस’ने खळबळ माजवली. त्यामुळे ‘इसिस’चे नाव जगभर गाजत असताना अल-कायदाशी निगडित संघटनेने माली या आफ्रिकी देशातील आंतरराष्ट्रीय हॉटेलवर हल्ला करून १०० जणांना ओलिस ठेवले. त्यामुळे सर्वांचे लक्ष पुन्हा अल-कायदाकडे गेले.
या घटना पाहता या दोन संघटनांतील स्पर्धा किती तीव्र झाली आहे, हे सोशल मीडियावरून दिसून येते. मालीवरील हल्ल्याबाबत अल-कायदाच्या एका समर्थकाने टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, मालीत त्यांचे (इसिस) अस्तित्व नाही. त्यामुळे ही कारवाई कोणी केली हे अल्लाला ठाऊक. आमच्यापासून ‘इसिस’ला बऱ्याच गोष्टी शिकावयाच्या आहेत.
सध्या सिरिया आणि इराकमधील संघर्ष पाहता ‘इसिस’ ही संघटना मूलतत्त्ववादी मुस्लिमांत सर्वाधिक लोकप्रिय आणि ‘प्रेरणादायक’ असल्याचे सोशल मीडियावरून दिसून येत आहे. सिरियातील धोरणावरून अल-काईदा-इसिस यांच्यात फूट पडल्याचा दावा अल-कायदा समर्थकाने केला आहे. (वृत्तसंस्था)