इसिसने केली आणखी एका ब्रिटिश नागरिकाची हत्या

By admin | Published: October 4, 2014 08:53 AM2014-10-04T08:53:34+5:302014-10-04T08:53:44+5:30

इसिस या मुस्लीम दहशतवादी संघटनेने आणखी एका ब्रिटिश ओलिसाचा शिरच्छेद केला असून या हत्येचा व्हिडीयो प्रसृत केला आहे

Isis murdered another British citizen | इसिसने केली आणखी एका ब्रिटिश नागरिकाची हत्या

इसिसने केली आणखी एका ब्रिटिश नागरिकाची हत्या

Next

ऑनलाइन टीम

बैरूत, दि. ४ - इसिस या मुस्लीम दहशतवादी संघटनेने आणखी एका ब्रिटिश ओलिसाचा शिरच्छेद केला असून या हत्येचा व्हिडीयो प्रसृत केला आहे. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना धमकावत नखशिखांत झाकलेल्या इसिसच्या दहशतवाद्याने हे कृष्णकृत्य केल्याचे शुक्रवारी जाहीर केले. सिरीयावर ओबामा विमानातून हल्ले चढवत असल्याचा उल्लेख करताना, तुम्ही आमच्यावर हल्ले करत आहात त्यामुळे आम्हीही तुमची माणसे मारू असं सांगत त्या दहशतवाद्याने अ‍ॅलन हेनिंग या मदत कार्य करणा-या पथकातील ब्रिटिश नागरिकाचा शिरच्छेद केला.
याआधीचे शिरच्छेद करणा-या दहशतवाद्यानेच हे काम केल्याचा संशय त्याच्या आवाजावरून येत आहे. इराक व सीरियामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रांताचा कब्जा केलेल्या इसिसच्या ताब्यात आणखी काही ओलीस असून त्यामध्ये पीटक कासिग या अमेरिकी नागिराकाचाही समावेश आहे. याबाबत अधिक तपशील देण्यास अमेरिकी अधिका-यांनी नकार दिला आहे. मात्र, हेनिंग यांच्या हत्येनंतर सीरियाव इराकमधला इसिसमुळे निर्माण झालेला प्रश्न अद्याप तीव्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याआधी अमेरिकी पत्रकार जेम्स फोली, स्टीवन सोटलॉफ व ब्रिटिश समाजसेवक डेव्हिड हेन्स या तिघांची हत्या इसिसने केली होती. या तिघांची हत्या करणारी व्यक्ती शब्दोच्चारावरून ब्रिटिश वाटत होती, याच व्यक्तिने हेनिंग यांचीही हत्या केल्याचा संशय आहे.
इंग्लंडमधल्या अनेक मुस्लीम नेत्यांनीही हेनिंग यांची सुटका करावी अशी मागणी इसिसकडे केली होती, परंतु इसिसने कुणालाही जुमानलेले नाही.  अल कायदामधून उत्पन्न झालेली इसिस ही संघटना अत्यंत क्रूर असून नृशंस हत्या, बलात्कार आणि लुटालुटीच्या बाबतीत हीन पातळीवर गणली जाते. भारतासह जगभरातून हजारो मुस्लीम तरूण इसिसमध्ये सामील झाल्याचे उघड झाले असल्याने या संघटनेविषयी अत्यंत काळजीचे वातावरण आहे. या संघटनेला संपवण्याचा विडा अमेरिकेने व पाश्चात्य देशांनी उचलला असून त्यांच्या यशावर सीरिया व इराकमधली शांतता अवलंबून असणार आहे.

Web Title: Isis murdered another British citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.