भारतातील बड्या नेत्यावर आत्मघाती हल्ल्याचा कट, आयसिसचा दहशतवादी रशियातून अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 02:08 PM2022-08-22T14:08:12+5:302022-08-22T14:10:59+5:30
IS Terrorist Arrest: भारतात सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या एका बड्या नेत्यावर आत्मघाती हल्ला करण्याचा कट उधळला गेला आहे. रशियामधून इस्लामिक स्टेट या दहतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.
मॉस्को - भारतात सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या एका बड्या नेत्यावर आत्मघाती हल्ला करण्याचा कट उधळला गेला आहे. रशियामधून इस्लामिक स्टेट या दहतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ल्याचा कट आखला होता. रशियामधील सरकारी एजन्सी फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेसने या दहशतवाद्याला पकडल्याची माहिती दिली आहे.
रशियन सिक्युरिटी एजन्सीने दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंधित एका दहशतवाद्याची ओळख पटवली होती. त्यानंतर एफएसबीने त्याला ताब्यात घेतले आहे. फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने हा दहशतवादी मध्य आशियातील एका देशातील नागरिक असल्याचे सांगितले आहे. त्याने भारतातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाच्या कुठल्यातरी नेत्यावर हल्ला करण्याचा कट आखला होता. सिक्युरिटी सर्व्हिसने याबाबतची माहिती दिली आहे.
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार आरोपीने एप्रिल ते जून दरम्यान तुर्कीमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते. आयएसच्या एका नेत्याने त्याला आत्मघातील हल्लेखोर म्हणून भरती केले होते. त्याला आत्मघाती हल्लेखोर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले होते. तो टेलिग्रामच्या माध्यमातून आयएसशी जोडला गेला होता. त्यानंतर त्याने आयएसशी निष्ठेची शपथ घेतली होती.
रशियाच्या सरकारी एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटनेने त्याला आवश्यक कागदपत्रांसह रशियामध्ये पाठवले होते. त्यानंतर तिथून त्याला भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भारतातील सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या नेत्यावर हल्ला करण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले होते. मात्र तो कोणत्या नेत्यावर हल्ला करणार होता, याबाबतची माहिती समोर येऊ शकलेली नाही.