इसिसच्या दहशतवाद्यांचे महिलांच्या वेषात पलायन
By admin | Published: October 21, 2016 02:41 PM2016-10-21T14:41:38+5:302016-10-21T14:52:12+5:30
स्वतःचा जिव वाचवण्यासाठी काही दहशतवादी महिलांचे कपडे घालून पळ काढताना पकडे गेले.
Next
ऑनलाइन लोकमत
इराक, दि. 21 - संपूर्ण जगात दहशत पसरवणारे इसिसचे दहशतवादी स्वतःच भीतीच्या सावटाखाली जगत असल्याचे समोर आले आहे. या दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या मोसुलमध्ये सुरू असलेल्या युद्धातून स्वतःचा जिव वाचवण्यासाठी काही दहशतवादी महिलांचे कपडे घालून पळ काढताना पकडे गेले. चार दिवसांपूर्वी, इराकी आणि कुर्दिश फोजांव्यतिरिक्त पश्चिमेकडील देशांनीही इसिसविरोधात युद्ध छेडले आहे. त्यामुळे अलिकडेच, इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या 'अबू बकर अल बगदादी'ने दहशतवाद्यांना त्यांच्या पत्नी आणि प्रेयसींना शहराबाहेर पाठवण्याचे आदेश दिले होते. याचाच फायदा घेत काही दहशतवादी महिलांचे कपडे घालून पळण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांचा हा प्रयत्न कुर्दिश फौजांनी हाणून पाडला.
ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन'मध्ये आलेल्या बातमीनुसार, महिलांचे कपडे घालून पळ काढणा-या या इसिसच्या संशयित दहशतवाद्यांना कुर्दिश फौजांनी मोसुल शहराबाहेर पकडले. सुरू असलेल्या युद्धामुळे बगदादी मात्र मोसुलच्या आतच आपल्या साथीदारांसोबत अडकला आहे. स्वतःच्याच घरावर हल्ले होत असल्याने आता इसिसचे दहशतवादी हल्ल्यापासून वाचण्यासाठी जिव मुठीत घेऊन पळत आहेत. स्वतःच्या बचावासाठी हे दहशतवादी सामान्य नागरिकांचा ढाल बनवून त्यांचा वापर करत असल्याची माहितीदेखील समोर येत आहे.
हवेतून होणारा बॉम्बहल्ल्यातही अडथळा निर्माण व्हावा यासाठी हे दहशतवादी तेथील तेलाच्या विहिरींना आग लावत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, दुसरीकडे, युद्धाच्या मैदानातून पळ काढणा-या दहशतवाद्यांप्रकरणी अमेरिकेसहीत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. हे दहशतवादी जर सीरियातील रक्कामध्ये पोहोचले तर तेथील अन्य दहशतवाद्यांसोबत हातमिळवणी करुन पुन्हा गट स्थापन करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.