लंडन हल्ल्यामागे इसिसच
By Admin | Published: March 24, 2017 12:33 AM2017-03-24T00:33:25+5:302017-03-24T00:33:25+5:30
ब्रिटनमध्ये बुधवारी दुपारी पार्लमेंट परिसराच्या बाहेरील हल्ला आम्ही घडविला होता, अशी कबुली इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने दिली आहे.
लंडन : ब्रिटनमध्ये बुधवारी दुपारी पार्लमेंट परिसराच्या बाहेरील हल्ला आम्ही घडविला होता, अशी कबुली इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने दिली आहे. या हल्लाप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवादी हल्ल्यात पाच जण मरण पावले असून, संशयित अतिरेक्याला पोलिसांनी कालच ठार केले. तो एकटाच होता, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
अतिरेक्यांच्या कारने चिरडल्याने काही जण मृत्युमुखी पडले आहेत. या अतिरेकी हल्ल्यात एकूण पाच जणांचा मृत्यू आणि ४० जण जखमी झाले आहेत. २९ जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे. अमेरिका, भारतसह सर्व देशांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
पार्लमेंटचे अधिवेशन सुरू असतानाच हा हल्ला झाला होता. त्यामुळे कालची बैठक रद्द करण्यात आली होती. मात्र आज पार्लमेंटचे काम नेहमीप्रमाणे सुरू झाले. जखमी पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी खा. टोबिअल एल्वुड यांनी काल प्रचंड धावपळ केली आणि प्रथमोपचारही केले. मात्र रुग्णवाहिका येण्यास काहीसह विलंब झाल्याने सदर अधिकारी मरण पावला. कीथ पामर (४८) असे त्याचे नाव आहे.
हल्लेखोराने मुख्य प्रवेशद्वारातून पार्लमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असता, त्याला कीथ पामर यांनी अडवले. तेव्हा त्याने किथ यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर येथील अधिकाऱ्यांनी या हल्लेखोराला गोळ्या घालून ठार मारले. जखमी झालेल्या दहा ते बारा लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सेंट थॉमस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका महिलेला मृत घोषित केले आहे. ब्रिटनमध्ये एका दशकानंतर झालेला हा सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला असून, पंतप्रधान थेरेसा मे यांनी या घटनेचा निषेध केला. लोकशाही मूल्यांवरील हा हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोण होता हल्लेखोर?-
लंडन आणि बर्मिंगहॅममध्ये सात जणांना अटक करण्यात आली असून, ठार झालेल्या हल्लेखोराची ओळखही पटली आहे. त्याचे नाव खालिद मसूद असे असून, तो ब्रिटिश नागरिक आहे.
केंट येथे जन्मलेला ५२ वर्षीय मसूद हा अनेक गुन्ह्यांसाठी पोलिसांना हवा होता. पोलिसांची त्याच्यावर नजर होतीच, पण दहशतवादी कृत्याप्रकरणी त्याच्यावर कोणताही गुन्हा नव्हता.