‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 03:10 PM2024-11-27T15:10:39+5:302024-11-27T15:11:40+5:30
Bangladesh News: अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेले हल्ले आणि धर्मगुरू चिन्मय प्रभू यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईनंतर आता इस्कॉनवर बंदी घालण्याची तयारी बांगलादेश सरकारकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर बांगलादेशात सुरू झालेली उलथापालथ अद्याप थांबलेली नाही. दरम्यान, अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेले हल्ले आणि धर्मगुरू चिन्मय प्रभू यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईनंतर आता इस्कॉनवर बंदी घालण्याची तयारी बांगलादेश सरकारकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.
त्यातच आता बांगलादेश सरकारने इस्कॉन ही धार्मिक कट्टरतावादी संघटना असल्याचा दावा केला आहे. बांगलादेशच्या अॅटॉर्नी जनरल यांनी याबाबत हायकोर्टात माहिती दिली आहे. सरकारचा हा मुख्य अजेंडा असून, त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता बांगलादेशमध्ये इस्कॉनवर लवकरच बंदी घालण्यात येणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
बांगलादेशच्या अॅटॉर्नी जनरल यांनी कोर्टात सांगितले की, इस्कॉन ही एक धार्मित कट्टरतावादी संघटना आहे. त्यानंतर कोर्टाने इस्कॉनबाबत सरकारची भूमिका आणि देशातील सद्यस्थिती याबाबतची माहिती देण्याचे आदेश दिले. तसेच देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सतर्क राहण्याची सूचनाही कोर्टाने सरकारला दिली आहे.
दरम्यान, इस्कॉनशी संबंधित धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली २५ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर बांगलादेशमधील कोर्टाने त्यांना जामीन न देता त्यांची तुरुंगात रवानगी केली होती. या कारवाईनंतप चिन्मय दास यांचे समर्थक रस्त्यावर उतरले होते. तसेच बांगलादेशमध्ये तीव्र आंदोलनांनाही सुरुवात झाली होती. त्या दरम्यान सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत किमान १० जण जखमी झाले होते.