इस्लामिक स्टेटकडून २१ जणांचा शिरच्छेद
By admin | Published: February 17, 2015 02:38 AM2015-02-17T02:38:50+5:302015-02-17T02:38:50+5:30
इसिस वा इस्लामिक स्टेटस्ने आपल्या क्रौर्याची परिसीमा गाठत नवी चित्रफीत प्रसिद्ध केली
कैरो : इसिस वा इस्लामिक स्टेटस्ने आपल्या क्रौर्याची परिसीमा गाठत नवी चित्रफीत प्रसिद्ध केली असून, या चित्रफितीत लिबियाच्या किनारपट्टीवर इजिप्तमधील ख्रिश्चन समाजाच्या २१ नागरिकांचे सामूहिक हत्याकांड दाखविले आहे.
ओलिस असणारे २१ इजिप्शियन नागरिक केशरी पोशाखात हात मागे बांधून उभे आहेत व हल्लेखोर त्यांचे शिरकाण करत आहे.ही चित्रफित प्रसिद्ध झाल्यानंतर इजिप्तने लिबिया या शेजारी देशाावर तत्काळ हवाई हल्ले सुरु केले असून, इजिप्तने वाढत्या दहशतवादाविरोधात युद्धाची घोषणा केली आहे.
ही चित्रफित पाच मिनिटाची असून, लिबियाची राजधानी त्रिपोलीजवळील एका किनारपट्टीवर हे हत्याकांड घडत असताना दिसत आहे.या चित्रफितीमुळे इसिस पुन्हा क्रूर हत्याकांडाकडे वळताना दिसत आहे. या हल्ल्यातील एका दहशतवाद्याने रोमवर विजय मिळवू असा इशारा दिला आहे. या चित्रफितीनंतर इजिप्तमध्ये सात दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे.
या चित्रफितीची भीषणता पाहिल्यानंतर प्रथमच इजिप्तने लिबियाविरोधात लष्करी कारवाईची जाहीर घोषणा केली आहे.
ओसामा बिन लादेनच्या शरीरात जे रक्त खेळत होते, तेच रक्त आता तुमच्या रक्तात मिसळणार आहे असे एक दहशतवादी बोलताना दिसत आहे. या नागरिकांचे गेल्या महिन्यात लिबियातून अपहरण झाले होते.
नागरिकांची हत्या करून इसिसच्या जिहादींनी इजिप्तचे रक्त सांडले आहे. त्यामुळे त्याचा सूड घेणे भाग आहे. इजिप्त आपल्या नागरिकांचे संरक्षण कोणत्याही पातळीपर्यंत जाऊन करणार असून, दहशतवादाचा बीमोड करतील, असे लष्कराचे प्रवक्ते, मोहंमद समीर यांनी या निवेदनात म्हटले आहे.
इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चन नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्के आहे. इजिप्तमध्ये २०११ साली झालेल्या क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन नागरिक लिबियात गेले आहेत. सोमवारी झालेल्या लष्करी कारवाईत तीन लहान मुले व दोन महिला असे नागरिक मारले गेले. (वृत्तसंस्था)
चित्रफीत प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांनी इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनी सरकारी टीव्हीवर जनतेला उद्देशून भाषण केले असून, या भीषण हत्याकांडाचा अशा प्रकारे प्रतिकार करणे हा इजिप्तचा हक्क असल्याचे म्हटले आहे.
या हत्याकांडाचा बदला घेण्याची ही योग्य रीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ख्रिश्चन नागरिकांची अशाप्रकारे करण्यात आलेली हत्या, या विषारी हल्ल्यानंतर दहशतवादाचा जगाला विळखा घालणाऱ्या विषवल्लीचा बीमोड झालाच पाहिजे, असे अल सीसी यांनी म्हटले आहे.