गाझावरील हल्ल्यामुळे इस्लामिक देश संतप्त; एकत्र येत हल्ल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 06:50 AM2023-10-19T06:50:24+5:302023-10-19T06:50:36+5:30
अमेरिका इस्रायलसोबत, पण चुका टाळण्याचा सल्ला. युद्ध भडकण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागल्याने कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडाला आहे.
जेरुसलेम : गाझा पट्टीतील एका हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटात ५०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्यामुळे जगभरातील इस्लामिक राष्ट्रांत संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्यामुळे सर्व मुस्लिम देश एकत्र येऊन हल्ला करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याची झलक मुस्लिम देशांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत होणारी बैठक रद्द करून दाखवली आहे.
जो बायडेन युद्धाच्या बाराव्या दिवशी बुधवारी इस्रायलमध्ये दाखल झाले. ९/११ हल्ल्याच्या वेळेस अमेरिकेने ज्या चुका केल्या त्याची पुनरावृत्ती आता इस्रायलने करू नये असे जो बायडेन यांनी सांगितले.
पेट्रोल महागणार? कच्च्या तेलाचा भडका
युद्ध भडकण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागल्याने कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडाला आहे. या प्रदेशातील तेल पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका आहेच शिवाय इराणने इस्रायलवर तेल निर्बंध लादण्याची मागणी केली आहे.
५ ऑक्टोबर रोजी ८४ डॉलर प्रति बॅरल असलेल्या कच्च्या तेलाच्या दरात १३ दिवसांत १० डॉलर प्रति बॅरलने वाढ होत ते ९३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. आखाती देशातून तेल आयात करत असल्याने याचा फटका भारताला बसेल.
अमेरिकेवर नाराजी
स्फोटानंतर जॉर्डनने जो बायडेन, पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी आणि जॉर्डनचे राजा अब्दुल्ला द्वितीय यांची नियोजित शिखर परिषद रद्द करत ते युद्ध रोखण्यासाठी सक्षम नसल्याचे म्हटले.