इस्लामिक स्टेटने स्वीकारली जकार्ताच्या हल्ल्याची जबाबदारी
By Admin | Published: January 14, 2016 05:59 PM2016-01-14T17:59:07+5:302016-01-14T17:59:07+5:30
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने जकार्तामधल्या बाँबस्फोट व अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
>ऑनलाइन लोकमत
जकार्ता (इंडोनेशिया), दि. १४ - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने जकार्तामधल्या बाँबस्फोट व अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इस्लामिक स्टेटचा प्रपोगंडा करणा-या काही संस्थांकडून यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे.
आज सकाळी इंडोनेशियाच्या राजधानीला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. विदेशी नागरीक आणि सुरक्षा रक्षकांवर प्रामुख्याने हल्ला करण्यात आला. पाच संशयित दहशतवाद्यांसह एकूण सात जण या हल्ल्यात ठार झाले आहेत.
मॅकडोनल्ड व अन्य मल्टिनॅशनल कंपन्यांची आउटलेट्स असलेल्या सारिनाह शॉपिंग सेंटर परीसरामध्ये हा उत्पात घडवून आणण्यात आला. याच परीसरात संयुक्त राष्ट्रांचे कार्यालय आहे तसेच अनेक सरकारी कार्यालये आहेत. इस्लामिक स्टेटनेच हा हल्ला घडवल्याचे सरकारी सूत्रांनी अधिकृतपणे मान्य केले नसले तरी, पॅरीस हल्ल्याप्रमाणेच या हल्ल्याची कार्यपद्धती असल्याचे सांगत इस्लामिक स्टेटवर जनरल अंतोन चार्लिआन यांनी संशय व्यक्त केला आहे.
नोव्हेंबरमध्ये इंडोनेशियाच्या गुप्तचर विभागाला इस्लामिक स्टेट मोठे हल्ले करणार असल्याची माहिती मिळाली होती, असेही चार्लियान यांनी पत्रकारांना सांगितले.
त्यामुळे नववर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमांच्या दरम्यान पोलीसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. गेल्या वर्षीपासून इंडोनेशियाकडे इस्लामिक स्टेटचे लक्ष गेले असून, मध्यपूर्वेच्या पलीकडील देशांमध्ये पण खलिफाची राजवट निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय असल्याचे एका अभ्यासकाने निदर्शनास आणले आहे. त्यादृष्टीने इस्लामिक स्टेट इंडोनेशियाला केंद्रस्थानी ठेवणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
याआधी इंडोनेशियात झालेले दहशतवादी हल्ले अल कायदाशी संबंधित दहशतवादी संघटनांनी केले होते. या संघटनांचेही उद्दिष्ट्य शरीयावर आधारीत खलिफाची राजवट आणण्याचे होते. अल कायदा निष्प्रभ झाल्यानंतर या दहशतवादी संघटना इस्तामिक स्टेटच्या संपर्कात आल्याचा एक कयास व्यक्त होत आहे.