इस्रायलकडून पुन्हा गाझापट्टीत हवाई हल्ला, भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू; एकूण सात जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 09:06 AM2024-04-03T09:06:52+5:302024-04-03T09:07:28+5:30
Israel attacks Gaza, Indian Origin woman killed: मारले गेलेले नागरिक हे ऑस्ट्रेलिया, पोलंड, ब्रिटन, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि कॅनडातील असल्याचे समोर आले आहे
Israel attacks Gaza, Indian Origin woman killed: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध काही केल्या संपायचे नाव घेत नाहीये. उलट दिवसेंदिवस या युद्धाची तीव्रता आणि त्यामुळे होणारे नुकसान चिंताजनक आहे. गाझा पट्टीत सातत्याने केल्या जात असलेल्या हल्ल्यांमध्ये केवळ स्थानिक नागरिकच नव्हे तर विदेशी नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागत आहे. इस्रायलने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यात वर्ल्ड सेंट्रल किचनमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिलीफ (मदत) कर्मचारी ठार झाले. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यात भारतीय वंशाच्या लालजावमी फ्रँककॉम या महिलेचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पुष्टी केली की ४३ वर्षीय फ्रँककॉम यांचा ठार झालेल्या ६ नागरिकांच्यात समावेश आहे. तसेच घटनेची संपूर्ण जबाबदारी इस्रायल सरकारने घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, वर्ल्ड सेंट्रल किचनमधील सहा आंतरराष्ट्रीय मदत कर्मचारी युद्धग्रस्त गाझा भागातील लोकांना मदत करण्यासाठी स्वयंसेवा (Volunteer) करत आहेत. अशा मदतनीसांना ठार करणे स्वीकारार्ह नाही. म्हणूनच या हल्ल्याबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे अशी आम्ही मागणी करतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियन वडील आणि मिझोरमधील आई यांच्या पोटी जन्मलेली फ्रँककॉम युद्धग्रस्त उत्तर गाझामधील लोकांना मदत करण्याच्या मोहिमेवर काम करत होती, परंतु सोमवारी रात्री उशिरा इस्रायली हवाई हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही हा हल्ला इस्रायली सैन्याने केल्याचे मान्य केले आहे. या हल्ल्यात ठार झालेले सात जण हे ऑस्ट्रेलिया, पोलंड, ब्रिटन, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि कॅनडाचे नागरिक असल्याचे समोर आले आहेत.