हमासच्या लष्करी प्रमुखालाही इस्रायलने संपवलं; महिन्याभराने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 03:52 PM2024-08-01T15:52:57+5:302024-08-01T16:23:26+5:30

हमाससोबतच्या युद्धात इस्रायलने पुन्हा मोठी कामगिरी केली आहे. हमासचा लष्करी प्रमुख मोहम्मद दिफ मारला गेल्याची माहिती समोर आली आहे.

Israel also killed Hamas' military chief; Confessed after a month | हमासच्या लष्करी प्रमुखालाही इस्रायलने संपवलं; महिन्याभराने दिली कबुली

हमासच्या लष्करी प्रमुखालाही इस्रायलने संपवलं; महिन्याभराने दिली कबुली

Mohammed Deif Eliminated : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास यांच्यात गेल्या महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. अशातच बुधवारी हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया याची हत्या झाल्याची माहिती समोर आली. इराणच्या तेहरानमध्ये इस्माईल हानियाची हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरमध्ये हमासच्या अतिरेकी गटाने केलेल्या हल्ल्यानंतर तो इस्रायलच्या हिटलिस्टवर आला होता. त्यामुळेच आता हानिया याच्या हत्येचा संशय इस्रायलवर आहे. दुसरीकडे हमासच्या आणखी एका प्रमुखाची हत्या झाल्याची माहिती इस्रायलने दिली.

इराणमध्ये हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हानिया याची हत्या केल्यानंतर इस्रायलला दुसरे मोठे यश मिळाले आहे. इस्रायलने दावा केला आहे की हमासचा लष्करी प्रमुख मोहम्मद दीफ हा गाझामधील हल्ल्यांदरम्यान मारला गेला आहे. एक डोळा असलेला मोहम्मद दीफ हा इस्रायलमध्ये कुप्रसिद्ध होता.  इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. अशातच इस्त्रायली लष्कराने गुरुवारी मोहम्मद दीफला ठार मारल्याची घोषणा केली.

हमासचा लष्करी प्रमुख मोहम्मद दीफ हा गाझाच्या दक्षिणेकडील खान युनिस भागात गेल्या महिन्यात केलेल्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इस्रायली सैन्याने गुरुवारी दिली. "१३ जुलै २०२४ रोजी खान युनिसच्या परिसरात लढाऊ विमानांनी हल्ला केला आणि तपासानंतर मोहम्मद दीफ हल्ल्यात मारला गेल्याचे म्हटलं जाऊ शकते,” असे इस्रायलच्या लष्करी निवेदनात म्हटले आहे. मोहम्मद दीफची पॅलेस्टिनी संघटनेत मोठी कारकीर्द होती आणि अनेक दशकांपासून इस्रायल त्याचा शोध घेत होता.

कोण होता मोहम्मद दीफ?

हमास कमांडर मोहम्मद दीफने इस्रायलला अडचणीत आणले आहे. इस्रायलने त्याला अनेकवेळा मारण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो निसटला. मोहम्मद दीफ हा हमासचा अत्यंत धोकादायक कमांडर मानला जात होता. याह्या सिनवार आणि डीफ यांनी मिळून इस्रायलवर हल्ला करण्याचा कट रचला होता. इस्त्रायलने डीफला मारण्यासाठी दक्षिण गाझामध्ये हवाई हल्ला केला होता, ज्यामध्ये ९० लोक मारले गेले होते.

डीफचा समावेश इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता. डीफ हा हमासच्या कासान ब्रिगेडचा संस्थापक आहे. तो २० वर्षांपासून हमासविरुद्ध युद्ध लढत आहे. ५८ वर्षीय डीफ लोकांसमोर यायचा नाही. मात्र जेव्हा हमास टीव्ही चॅनल्सवर तो दिसला तेव्हा लोकांना कळले होते की काहीतरी मोठे घडणार आहे आणि तसेच घडले. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यात किमान १२०० लोक मारले गेले आणि सुमारे २५० लोकांना ओलीस बनवले गेले.

त्याचा जन्म खान युनूसच्या एका निर्वासित छावणीत झाला होता. त्याचे नाव मोहम्मद मसरी होते पण हमासमध्ये सामील झाल्यानंतर तो मोहम्मद दीफ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९८७ मध्ये तो हमासमध्ये सामील झाला. दीफने गाझा विद्यापीठात विज्ञानाचा अभ्यास केला. त्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचा अभ्यास केला. १९८ मध्ये त्याला इस्रायलने अटक केली आणि त्यानंतर १६ महिन्यांनी सोडले. २००२ मध्ये तो कासम ब्रिगेडचा कमांडर झाला. इस्रायलच्या एका हल्ल्यात त्याला एक डोळा गमवावा लागला. याशिवाय तयांच्या एका पायालाही गंभीर दुखापत झाली होती. २०१४ मध्ये, इस्रायली हवाई हल्ल्यात त्याची पत्नी आणि सात महिन्यांचे मूल मारले गेले होते. 

Web Title: Israel also killed Hamas' military chief; Confessed after a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.