इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 08:56 PM2024-05-14T20:56:35+5:302024-05-14T21:02:06+5:30
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हमाससोबत युद्ध लढणारा इस्रायल सध्या तणावात आहे. इस्रायलविरुद्धआंतरराष्ट्रीय न्यायालयात १६ आणि १७ मे रोजी सुनावणी होणार आहे. गाझापट्टीमध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या प्रकरणी दक्षिण आफ्रिकेने याचिका दाखल केली आहे. यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पॅलेस्टिनींच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी इस्रायलवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यामध्ये पॅलेस्टिनी लोकांच्या हक्कांचे मोठे नुकसान होण्यापासून वाचवण्यासोबत इस्रायलला शिक्षा देण्याची न्यायालयाकडे मागणी करण्यात आली होती.
पॅलेस्टिनी नागरिक गाझातील सध्याची परिस्थिती १९४८ च्या अरब-इस्त्रायली युद्धापेक्षाही भयंकर असल्याचे सांगत आहेत. अरब-इस्त्रायल युद्धापूर्वी आणि त्यादरम्यान जवळपास सात लाख पॅलेस्टिनींना पळून जावे लागले होते. दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर गाझामध्ये सुरू झालेल्या युद्धात ३,५००० पॅलेस्टिनी मारले गेल्याचे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हमासच्या हल्ल्यात १२०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू
हमासच्या हल्ल्यात जवळपास १२०० इस्रायली मारले गेले. युद्धामुळे गाझाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना, म्हणजे सुमारे १७ लाख लोकांना आपली घरे सोडून पळावे लागले आहे. १९४८ च्या युद्धापूर्वी आणि त्यादरम्यान स्थलांतरित झालेल्या लोकांच्या संख्येपेक्षा ही संख्या दुप्पट आहे.
"गाझाच्या पुनर्बांधणीची कल्पना करणे फार कठीण"
सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठातील पॅलेस्टिनी सहाय्यक प्राध्यापक यारा अस्सी यांनी युद्धामुळे नागरी पायाभूत सुविधांना झालेल्या नुकसानीचा अभ्यास केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, गाझा पुनर्बांधणीसाठी कोणत्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांची आवश्यकता असेल, याची कल्पना करणे फार कठीण आहे.