हमासशी युद्ध सुरू असतानाच इस्रायलचे सिरियावर हवाईहल्ले; दोन विमानतळांवर सोडली रॉकेट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 12:02 AM2023-10-13T00:02:02+5:302023-10-13T00:02:34+5:30
Israel Attack on Syria: इराणमधून येणाऱ्या शस्त्रास्त्रांना लक्ष्य करण्यात आल्याचा अंदाज
Israel Attack on Syria: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. याचदरम्यान, इस्रायलने एकाच वेळी सीरियातील दमास्कस आणि अलेप्पो या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणमधून येणाऱ्या शस्त्रास्त्रांना लक्ष्य केले गेले, असा संशय व्यक्त केला जात आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर या दोन्ही विमानतळांवरील सर्व सेवा बंद करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. इस्रायली सैन्याने दमास्कस आणि अलेप्पो विमानतळांवरील हल्ल्याची पुष्टी केली आहे. स्थानिक मीडिया चॅनल शाम एफएमचे म्हणणे आहे की सीरियन लष्कराने या दोन्ही हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
अलेप्पो विमानतळावर इस्रायलच्या हल्ल्यात नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही सांगण्यात येत आहे. सीरियाच्या सरकारी टीव्ही वाहिनीने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास इस्रायली लष्कराने अलेप्पो आणि दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळांवर रॉकेट डागले. त्यामुळे विमानतळांच्या धावपट्टीची दुरवस्था झाली आहे. गाझामधील इस्रायलच्या गुन्ह्यांवरून जगाचे लक्ष वेधण्याचा हा हल्ला आहे.
त्याचवेळी इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर सातत्याने हल्ले करत आहे. गाझा पट्टीमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 1100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांना गाझा पट्टी रिकामी करण्यास सांगितले जात आहे.