इस्रायल काही थांबेना, रणगाडे गेले रुग्णालयात; हवेत गोळीबार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 06:59 AM2023-11-16T06:59:13+5:302023-11-16T06:59:19+5:30
हमासला संपूर्ण नष्ट करण्यासाठी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
जेरूसलेम : इस्रायली रणगाड्यांनी दोन-अडीच आठवड्यांपूर्वी उत्तर गाझात प्रवेश केला होता. त्यानंतर विविध ठिकाणी हल्ले करत बुधवारी ते थेट शिफा रुग्णालय परिसरात घुसले. या घुसखोरीचा संयुक्त राष्ट्राने निषेध केला. शिफा रुग्णालय हे हमासचे सर्वात मोठे कमांड सेंटर असून तेथून ते दहशतवादी कृत्य करत असल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. त्यामुळे हमासला संपूर्ण नष्ट करण्यासाठी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
इस्रायलचे सहा रणगाडे आणि जवळपास १०० हून अधिक सैनिक बुधवारी शिफा रुग्णालयात घुसले. त्यांनी सर्जिकल आणि आपत्कालीन विभागातील लोकांव्यतिरिक्त सर्वांनी बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यासाठी त्यांनी हवेत गोळीबारही केला. रुग्णालयात अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने अनेकांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर गाझामध्ये इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी इंधनाचा पहिला टँकर इजिप्तमार्गे गाझात दाखल झाला.