संघर्ष भडकणार! इराणच्या तळावर हल्ला करताना इस्त्रायलचे F-16 फायटर जेट पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 05:32 PM2018-02-10T17:32:08+5:302018-02-10T17:41:13+5:30
सीरियाच्या युद्धात पहिल्यांदाच इस्त्रायलने आपले फायटर विमान गमावले आहे. इस्त्रायलच्या हद्दीत इराणचे ड्रोन विमान दिसल्यानंतर इस्त्रायलने हवाई हल्ले केले.
जेरुसलेम - सीरियामध्ये सुरु असलेल्या युद्धात शनिवारी इस्त्रायली एअर फोर्सचे एफ-16 हे फायटर विमान पाडण्यात आले. इराणचे ड्रोन विमान दिसल्यानंतर त्या दिशेने झेपावलेल्या एफ-16 फायटर जेटला विमानविरोधी अस्त्रे डागून पाडण्यात आले. इस्त्रायलच्या लष्कराने ही माहिती दिली आहे. विमान कोसळण्याआधी दोन वैमानिकांनी पॅराशूटच्या सहाय्याने उडया मारल्याने ते बचावले.
सीरियाच्या युद्धात पहिल्यांदाच इस्त्रायलने आपले फायटर विमान गमावले आहे. इस्त्रायलच्या हद्दीत इराणचे ड्रोन विमान दिसल्यानंतर इस्त्रायलने हवाई हल्ले केले. सीरियाने इस्त्रायल अतिआक्रमकता दाखवत असल्याचा आरोप केला आहे. कोसळण्याआधी इस्त्रायलच्या लढाऊ विमानाने सीरियन एरियल डिफेन्स सिस्टिम आणि सीरियामधील इराणच्या 12 लक्ष्यांवर हल्ला केला असे इस्त्रायलच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
इस्त्रायलने सीरियामध्ये हल्ले करण यात नवीन काही नाहीय पण इस्त्रायलचे लढाऊ विमान पडल्यामुळे संघर्ष अधिक भडकू शकतो. या निमित्ताने इस्त्रायलाने प्रथमच जाहीरपणे सीरियामध्ये हल्ले करत असल्याचे मान्य केले आहे. सीरियामध्ये इराणच्या सैनिकांच्या तैनातीवर इस्त्रायलने अलीकडे अनेकदा इशारा दिला आहे. इराणच्या या मानवरहीत टेहळणी विमानाने सीरियामधून आमच्या हद्दीत प्रवेश केला होता असे इस्त्रायलच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले.