इस्रायल-हमास संघर्षात आतापर्यंत २४०० जणांचा मृत्यू; शहराबाहेर पडण्यासाठी लोकांची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:05 PM2023-10-12T12:05:50+5:302023-10-12T12:06:15+5:30

हमास दहशतवाद्यांचे प्रमुख केंद्र असलेल्या गाझाला इस्रायलने चारही बाजूंनी घेरले असून, २३ लाख लोक शहराबाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत.

Israel-Hamas conflict kills 2,400 so far; People struggle to get out of the gaza city | इस्रायल-हमास संघर्षात आतापर्यंत २४०० जणांचा मृत्यू; शहराबाहेर पडण्यासाठी लोकांची धडपड

इस्रायल-हमास संघर्षात आतापर्यंत २४०० जणांचा मृत्यू; शहराबाहेर पडण्यासाठी लोकांची धडपड

दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. यामध्ये २४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात १२०० लोक मारले गेले आहेत, तर गाझा पट्टीमध्ये इस्रायली हवाई दलाच्या गोळीबारात १२०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

हमास दहशतवाद्यांचे प्रमुख केंद्र असलेल्या गाझाला इस्रायलने चारही बाजूंनी घेरले असून, २३ लाख लोक शहराबाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत. गाझा शहराभोवती इस्रायलचे जवळपास ४ लाख सैन्य तैनात असून, ते गाझामध्ये जमिनीवरून हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे. हमासने केलेल्या रक्तपाताचा बदला घेण्याची इस्रायलने शपथ घेतली असून, त्यासाठी शक्य ते सर्व पर्याय इस्रायल अजमावत आहे.

अन्न, पाणी, इंधन आणि औषधांचा पुरवठा बंद केल्याने जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राणघातक हल्ल्यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांनी शहराबाहेर पडण्याची धडपड सुरू केली आहे. हवाई हल्ल्यांमुळे शहर बेचिराख झाले असून, ढिगाऱ्याखाली सैनिक, पुरुष, स्त्रिया, मुले आणि अज्ञात वृद्धांचे मृतदेह उरले आहेत. दरम्यान, आधुनिक अमेरिकन शस्त्रांची पहिली खेप इस्रायलमध्ये दाखल झाल्यामुळे या युद्धाची भीषणता दिवसेंदिवस वाढत आहे.

नागरिकांच्या मदतीसाठी धावाधाव

मानवतावादी गट इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहेत; परंतु, गाझाच्या तीव्र नाकेबंदीमुळे व लढाईमुळे ते गुंतागुंतीचे होत आहे. इजिप्तच्या रेड क्रॉस संघटनेकडून दाेन टनापेक्षा जास्त वैद्यकीय पुरवठा गाझाला पाठविण्यात आला आहे. अन्न आणि इतर वितरण आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कैद्यांच्या सुटकेसाठी ओलिसांचा वापर

हमासच्या वरिष्ठ कमांडरने म्हटले की, गाझामधील विध्वंसक युद्ध सुरू राहिल्यास इराण आणि हिजबुल्लासारखे मित्र या लढाईत मदतीला येतील. २०१४ च्या युद्धापासून हमास स्वतःचे रॉकेट आणि प्रशिक्षित सैनिक तयार करत आहे. ओलिस ठेवलेल्या शेकडो इस्रायलींचा वापर इस्रायली आणि  सर्व अरब तसेच पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेसाठी करेल, असेही ते म्हणाले.

इस्रायलच्या बाजूने कोणते देश उतरले? 

युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली हे देश एकत्र आले आहेत. या देशांच्या पंतप्रधानांनी एकत्र येत युद्धाबाबत चर्चा केली. दहशतवादाला कधीही समर्थन नाही, असे या देशांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. 

Web Title: Israel-Hamas conflict kills 2,400 so far; People struggle to get out of the gaza city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.