हमासने 50 ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात केली 'ही' मागणी, इस्रायलने फेटाळली; आता थेट युद्धच...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 03:39 PM2023-10-24T15:39:51+5:302023-10-24T15:42:25+5:30

Israel Palestine Conflict : हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत प्रत्युत्तर दिले. एवढेच नाही तर इस्रायलने गाझा पट्टीची नाकेबंदीही केली.

israel hamas in advanced talkss to release 50 more gaza hostages | हमासने 50 ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात केली 'ही' मागणी, इस्रायलने फेटाळली; आता थेट युद्धच...

हमासने 50 ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात केली 'ही' मागणी, इस्रायलने फेटाळली; आता थेट युद्धच...

इस्रायल आणि हमास यांच्यात 18 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हमासने आता दुहेरी नागरिकत्व असलेल्या 50 ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलकडून इंधन पुरवठ्याची मागणी केली आहे. मात्र, इस्रायलने ही मागणी फेटाळून लावली आहे. सर्व 220 ओलिसांची सुटका केल्यावरच ते इंधन पुरवठा करण्यास परवानगी देईल, असं इस्रायलचं म्हणणं आहे.

हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय हमासने शेकडो इस्रायली आणि परदेशी नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यापैकी हमासच्या लढवय्यांना गाझा पट्टीत ठेवण्यात आले आहे. काही ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, 220 नागरिक अजूनही हमासच्या ताब्यात आहेत.

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत प्रत्युत्तर दिले. एवढेच नाही तर इस्रायलने गाझा पट्टीची नाकेबंदीही केली. इस्रायलने अन्न, पाणी आणि इंधनाचा पुरवठाही बंद केला. त्यामुळे गाझा पट्टीत राहणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत हमासने 50 ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इंधन पुरवठा करण्यास परवानगी देण्याची अट ठेवली आहे.

टाइम्स ऑफ इस्रायलने एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलं आहे की, इस्रायल आणि हमास यांच्यात कतार आणि इजिप्तच्या माध्यमातून 50 ओलिसांची सुटका करण्यासाठी चर्चा सुरू आहे. यापूर्वी द वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या अहवालात म्हटले होते की, हमासने गाझामध्ये इंधन देण्याच्या बदल्यात दुहेरी नागरिकत्व असलेल्या 50 नागरिकांची सुटका करण्याची मागणी केली आहे.

इस्रायल ग्राउंड ऑपरेशनसाठी सज्ज

एकीकडे हमास आणि इस्रायल यांच्यात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे इस्रायलनेही गाझा पट्टीवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, हवाई दलाने गाझा पट्टीतील हमासच्या 400 स्थानांना लक्ष्य केले. या हल्ल्यात हमासचे अनेक कमांडरही मारले गेले आहेत. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, नुसीरत, शाती आणि हमासच्या अलफुरकन बटालियनचे डेप्युटी कमांडर या हल्ल्यात ठार झाले आहेत.

इस्रायलचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल हरजी हालेवी यांनी गाझा पट्टीतील त्यांचे हवाई हल्ले थांबणार नसल्याचे स्पष्ट केले. एवढेच नाही तर इस्त्रायली लष्कर जमिनीवर हल्ला करण्यासाठीही सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायली सैन्य गाझा पट्टीच्या आसपास तळ ठोकून आहे. युद्धामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. 
 

Web Title: israel hamas in advanced talkss to release 50 more gaza hostages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.