'पॅलेस्टिनी नागरिकांचा हमासच्या हल्ल्याशी संबंध नाही', जो बायडेन यांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 09:05 PM2023-10-15T21:05:20+5:302023-10-15T21:05:35+5:30
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायलने लोकांना परिसर सोडण्याचा आदेश दिला आहे.
Israel-Hamas: पॅलेस्टाईनी दहशतवादी संघटना 'हमास'ने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर काही मिनिटांत हजारो रॉकेट डागले. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ले सुरू केले. या हल्ल्यांनंतर पॅलेस्टाईनमधील लाखो लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका सोमवारपासून इस्त्रायलमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू करणार आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे एक मोठे वक्तव्य समोर आले आहे.
We must not lose sight of the fact that the overwhelming majority of Palestinians had nothing to do with Hamas’s appalling attacks, and are suffering as a result of them.
— President Biden (@POTUS) October 15, 2023
'पॅलेस्टाईनमधील मोठ्या लोकसंख्येचा हमासच्या हल्ल्यांशी काहीही संबंध नाही, पण त्याचे परिणाम भोगत आहेत. या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू नये', असे ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान, या संकट काळात अमेरिका इस्रायलला मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. अमेरिकेने दोन युद्धनौकांसह मोठे सैन्य इस्रायलच्या मदतीसाठी पाठवले आहे.
इस्रायल-लेबनॉन सीमेवरही युद्धाची परिस्थिती
इस्रायली मीडियानुसार, हे युद्ध अधिक तीव्र होऊ शकते, कारण इराण थेट त्यात सामील होण्याची शक्यता आहे. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, जेक सुलिव्हन यांनी इस्रायल-लेबनॉन सीमेवर युद्धाची शक्यता वर्तवली आहे. इराण दीर्घकाळापासून लेबनॉनमधील हमास आणि हिजबुल्लाह या दहशतवादी गटांचा समर्थक आहे आणि त्यांना पैसा आणि शस्त्रे पुरवतो. या पार्श्वभूमीवर यूएनचे भारतीय सैन्य लेबनॉन सीमेवर तैनात केल्याची माहिती मिळाली आहे.