हमासची १७०० ठिकाणे उद्धवस्त, ७०४ ठार...; गाझा पट्टीवर ७२ तास इस्रायलची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 11:19 AM2023-10-10T11:19:53+5:302023-10-10T11:27:11+5:30
Israel-Hamas War: इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.
हमास या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यावर इस्रायल सातत्याने प्रत्युत्तर देत आहे. इस्रायलमध्ये हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायली हवाई दल गेल्या ७२ तासांपासून गाझा पट्टीवर बॉम्बफेक करत आहे. इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. इमारतींचे ढिगाऱ्यांचे ढीग झाले आहेत.
इस्रायलने गाझामधील हमासची १७०० ठिकाणे नष्ट केले. यामध्ये ४७५ रॉकेट यंत्रणा आणि हमासच्या ७३ कमांड सेंटरचा समावेश आहे. इस्रायलने २३ इमारतींवरही हल्ला केला, ज्या हमास दहशतवादी वापरतात. याशिवाय २२ भूमिगत तळही उद्ध्वस्त करण्यात आले. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की गाझामध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यात ७०४ पॅलेस्टिनी ठार झाले असून त्यात १४३ मुले आणि १०५ महिलांचा समावेश आहे. तर ४ हजार लोक जखमी झाले आहेत.
हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी गाझा पट्टीतून इस्रायलवर अचानक हजारो रॉकेट डागले. हमासच्या हल्ल्यात सुमारे ९०० नागरिक ठार झाले आहेत. यामध्ये ११ अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्ध सुरू झाल्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते की ते या हल्ल्याला हमासच्या पिढ्या लक्षात ठेवतील अशा प्रकारे प्रत्युत्तर देतील. यानंतर इस्रायली सैन्याने जोरदार पलटवार केला. इस्रायलने हमासच्या दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. ४००हून अधिक हमास दहशतवादी मारले गेले आहेत.
दुसरीकडे, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी गाझा पट्टीला संपूर्ण वेढा घालण्याचे आदेश दिले आहेत, तर वीज, अन्न आणि पाणी यासह अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. इस्रायलने गाझा सीमेवर ३ लाख सैनिक तैनात केले आहेत. पॅलेस्टाईनमधून हमासचे दहशतवादी अजूनही इस्रायलमध्ये घुसत असल्याची बातमी आहे. इस्रायलने हमासवर केलेल्या झटपट हल्ल्यात आतापर्यंत ५०० दहशतवादी मारले गेले आहेत.
तिन्ही बाजूंनी हल्ले सुरूच-
इस्रायलच्या तिन्ही सैन्याने गाझा पट्टीत हमास या दहशतवादी संघटनेला लक्ष्य केले आहे. जिथे इस्रायली हवाई दल हमासच्या स्थानांवर बॉम्बफेक करत आहे. या बॉम्बहल्ल्यात अनेक मशिदी, निर्वासित शिबिर, हमास कमांड सेंटर आणि इस्लामिक जिहाद कमांड सेंटरवरही बॉम्बस्फोट झाले. इस्रायलने गाझा पट्टीतील शेकडो बहुमजली इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत.
५०-६० विमाने हवाई हल्ले-
इस्त्रायली हवाई दलाची ५०-६० लढाऊ विमाने हवाई हल्ल्यात सहभागी आहेत. इस्रायली हवाई दलाने आतापर्यंत गाझा पट्टीवर अनेक टप्प्यांत हवाई हल्ले केले आहेत. या कालावधीत १७०० लक्ष्य ठेवण्यात आले होते. युद्धाच्या सुरुवातीपासून, इस्रायली हवाई दलाच्या विमानांनी गाझावर १००० टन पेक्षा जास्त बॉम्ब टाकले आहेत.