इस्रायल हमास युद्ध: गाझावरील हल्ल्यांमध्ये वाढ, मृतांची संख्या ७,६५० वर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 05:38 AM2023-10-29T05:38:29+5:302023-10-29T05:39:03+5:30

इस्रायल पुढील आदेश येईपर्यंत कारवाई सुरूच ठेवणार

Israel Hamas War: Attacks on Gaza rise, death toll tops 7,650 | इस्रायल हमास युद्ध: गाझावरील हल्ल्यांमध्ये वाढ, मृतांची संख्या ७,६५० वर

इस्रायल हमास युद्ध: गाझावरील हल्ल्यांमध्ये वाढ, मृतांची संख्या ७,६५० वर

जेरुसलेम : गाझावर जमिनीवरून सुरू केलेले हल्ले सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे इस्रायलच्या लष्कराने स्पष्ट केले. गाझामधील कारवाईची इस्रायलने व्याप्ती वाढविली आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यानंतर आजवरच्या संघर्षात गाझामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७६५० वर पोहोचली असून, १९४५० जण जखमी झाले आहेत.

इस्रायलच्या लष्कराचे रिअर ॲडमिरल डॅनियल हगरी यांनी सांगितले की, गाझावर जमिनीवरून हल्ले चढविण्यात येत असून त्यात कुठेही खंड पडलेला नाही. गाझामध्ये इस्रायली रणगाडे शिरल्याचा व्हिडीओ त्या देशाच्या लष्कराने शनिवारी जारी केला. 
गाझातील भुयारे, बंकर नष्ट करण्यासाठी इस्रायली विमाने बॉम्बहल्ले करत आहेत. अशा प्रकारे गाझा शहरातील उत्तर भागात हमासने बांधलेली १५० भुयारे व बंकर शनिवारी नष्ट केल्याचा दावा इस्रायलने केला. गाझातील मोबाइल सेवा, वीजपुरवठा इस्रायलने बंद पाडला आहे. त्यामुळे गाझातील लोकांचे विलक्षण हाल 
होत आहेत.

संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्रांत भारताची तटस्थ भूमिका

  • संयुक्त राष्ट्रे : दहशतवाद ही घातक विचारसरणी असून, तिला देशांच्या सीमा, नागरिकत्व, वंश अशा गोष्टींची बंधने नसतात. जगातील कोणत्याही देशाने दहशतवादी कृत्यांचे समर्थन करू नये, अशी ठाम भूमिका भारताने इस्रायल-हमासमधील संघर्षाबाबत मांडली. या संघर्षाबाबत जॉर्डनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडलेल्या प्रस्तावावरील मतदानाप्रसंगी भारत तटस्थ राहिला.
  • इस्रायल-हमासमधील संघर्षात नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, गाझा पट्टीमध्ये शांतता नांदण्यासाठी मानवतावादी दृष्टीकोनातून तत्काळ पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी जॉर्डनने या प्रस्तावात केली होती. १९३ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हा प्रस्ताव शुक्रवारी मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाच्या बाजूने १२१ व विरोधात १४ मते मिळाली. 
  • भारतासह ४४ देश मतदानप्रसंगी तटस्थ राहिले व उर्वरित देश मतदानास अनुपस्थित राहिले. संपूर्ण गाझा पट्टीमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तत्काळ व विनाअडथळा पुरविण्यात याव्यात, अशी मागणीही या प्रस्तावात करण्यात आली होती.

Web Title: Israel Hamas War: Attacks on Gaza rise, death toll tops 7,650

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.