Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 12:10 AM2024-05-07T00:10:50+5:302024-05-07T00:11:48+5:30
Israel Hamas War Ceasefire Update: पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या ओलिसांचे काय होईल? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Israel Hamas War Ceasefire Update: इस्रायलच्या वेगवान हल्ल्यांनी वेढलेल्या हमासने युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य करण्याची घोषणा केली आहे. आता यावर इस्रायलला निर्णय घ्यायचा आहे. हमासने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कतार आणि इजिप्तलाही या निर्णयाची माहिती दिली आहे. कारण ते हमास आणि इस्रायलमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत होते. मात्र, तसे असले तरी पुढील परिस्थिती काय असेल? पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या ओलिसांचे काय होईल? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
हमासच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या निवेदनात युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य केल्याची पुष्टी करण्यात आली आहे. कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद अब्दुलरहमान अल थानी आणि इजिप्तचे मंत्री अब्बास कामेल यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात ही माहिती देण्यात आली आहे, असेही हमासचे नेते इस्माइल हनीयेह यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता यावर इस्रायलने निर्णय घ्यायचा आहे.
हमासने युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य केल्याचे जाहीर केल्यानंतर सेंट्रल गाझामध्ये आनंदाचे वातावरण आहे. बीबीबीने दिलेल्या वृत्तानुसार, अल अक्सा रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी जमली आहे. मुले आनंदाने जल्लोष करत आहेत. लोक नाचत आहेत. हा युद्धविराम त्यांच्यासाठी कितपत फायदेशीर ठरणार आहे, हे अद्याप त्यांना माहीत नसले तरी, युद्धविरामाच्या घोषणेने गाझावासीयांना दिलासा मिळाला आहे.
इस्रायल आणि हमासमधील वाढत्या तणावामुळे गाझापर्यंत मदत पोहोचत नव्हती. सोमवारी इस्रायलने केरेम शालोम हा गाझाला मदत पोहोचण्यासाठीचा मार्ग बंद केला होता. इस्रायलचा युक्तिवाद असा होता की हमासने एक दिवस आधी येथे रॉकेट डागले होते, ज्यामध्ये 4 इस्रायली सैनिक शहीद झाले होते. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. मात्र, गाझापर्यंत मदत पोहोचू शकली नाही, तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नेतन्याहू यांच्याशी बोलून इस्रायल लवकरच हा मार्ग खुला करणार असल्याचे आश्वासन घेतले. नेतन्याहू यांनी मानवतावादी मदतीसाठी हा मार्ग खुला करण्यास सहमती दर्शवल्याचेही बायडेन म्हणाले.