कपडे फाडले, थुंकले, कोण होती ती तरुणी? जिच्या मृतदेहासोबत हमासने केलं क्रौर्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 01:30 PM2023-10-08T13:30:59+5:302023-10-08T13:31:39+5:30
Israel-Hamas war: हमासचे दहशतवादी शेकडोंच्या संख्येने सीमा पार करून इस्राइलच्या हद्दीत घुसले. त्यांनी अनेक सामान्य नागरिकांचं अपहरण केलं. त्यात महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय होती.
इस्राइलमध्ये शनिवारी सकाळी हमासने केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी काही मिनिटांमध्येच तब्बल ५ हजार रॉकेट डागून इस्राइलमधील नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. तसेच हमासचे दहशतवादी शेकडोंच्या संख्येने सीमा पार करून इस्राइलच्या हद्दीत घुसले. त्यांनी अनेक सामान्य नागरिकांचं अपहरण केलं. त्यात महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय होती. या घटनांचे शेकडो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिला रडारड,आकांत करताना दिसत आहेत. तर हमासचे दहशतवादी त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात कुठलीही कसर सोडत नाही आहेत.
असाच एक व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांचा थरकाप उडत आहे. हा व्हिडीओ ज्यांनी कुणी पाहिला ते अस्वस्थ झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एका तरुणीच मृतदेह ट्रकमध्ये ठेवण्यात आला आहेत. त्यावर दहशतवादी बसले आहेत. ते या मृतदेहावरील कपडे उतरवत आहेत. त्याच्यावर थुंकत आहेत. तसेच बंदुका उंचावून इस्राइलवरील हल्ल्याचा आनंदोत्सव साजरा करत धार्मिक घोषणा देत आहेत. दहशतवाद्यांना वाटलं होतं की, त्यांनी इस्राइली महिलेला पकडलं आहे. मात्र प्रत्यक्षात ती तरुणी परदेशातील होती. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हमासच्या क्रौर्याची बळी ठरलेली ही तरुणी जर्मनीमध्ये राहणारी होती. शानी लाउक असं तिचं नाव होतं. ती टॅटू आर्टिस्ट होती. तसेच इस्राइलमध्ये एक म्युझिक फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी ती येथे आली होती. इस्राइलमध्ये घुसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनी इतर लोकांसोबत शानी हिचंही अपहरण केलं. त्यानंतर ३० वर्षीय शानीची हत्या केली.
शानी हिची बहिण तोमासिना वेनट्रॉब-लाउक हिने शानी हिचा मृतदेह ओळखला आहे. कुटुंबीयांनी शानी हिच्या शरीरावरील टॅटू आणि केसांवरून तिचा मृतदेह ओळखल्याचे तिने सांगितले. ती पुढे म्हणाली की, आम्हाला काही माहिती नाही. आम्ही कुठल्यातरी सकारात्मक वृत्ताची वाट पाहत होतो. ती खरोखरच शानी आहे. ती एका म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. ही बाब आमच्या कुटुंबीयांसाठी दु:स्वप्नासारखी आहे.