युद्धादरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा इस्राइलला दणका, गाझामधील नरसंहार रोखण्याचे दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 08:45 PM2024-01-26T20:45:50+5:302024-01-26T20:46:18+5:30
Israel Hamas War: प्रचंड जीवित आणि वित्तहानीनंतरही इस्राइलने गाझामधील हल्ले थांबवलेले नाहीत. मात्र आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्राइलला दणका दिला आहे.
गाझापट्टीमधील हमासच्या दहशतवाद्यांनी सीमा पार करून इस्राइलमधील शेकडो नागरिकांची हत्या केली होती. त्यानंतर चवताळलेल्या इस्राइलने हमासविरोधात युद्ध पुकारत गाझापट्टीमध्ये तुफान हल्ले केले होते. या भीषण संघर्षामध्ये गाझापट्टीमधील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. प्रचंड जीवित आणि वित्तहानीनंतरही इस्राइलने गाझामधील हल्ले थांबवलेले नाहीत. मात्र आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्राइलला दणका दिला आहे. इस्राइलने गाझापट्टीमध्ये हल्ल्यात झालेले मृत्यू आणि इतर नुकसानीची सर्व माहिती द्यावी आणि कुठल्याही प्रकारे होत असलेले गंभीर नुकसान टाळावे, असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत.
कोर्टाने आपल्या आदेशात सांगितले की, लष्कराकडून गाझामध्ये होत असलेला नरसंहार इस्राइलने थांबवावा. तसेच मानवतावादी दृष्टीकोनातून सुधारणावादी पावले उचलावीत. त्याबरोबरच कोर्टाने इस्राइलला याबाबत एका महिन्यात रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत.
इस्राइलने गाझापट्टीमध्ये नरसंहार केल्याचा आरोप करून दक्षिण आफ्रिकेने इस्राइलला संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचले होते. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने वरील आदेश दिले आहेत. गाझामधील इस्राइलच्या लष्करी कारवाईला रोखण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही दक्षिण आफ्रिकेने केली होती.