Israel : अली कादी ते अबू मेरादपर्यंत, इस्राइलने १० दिवसांत हमासच्या ६ टॉप कमांडरचा केला खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 04:30 PM2023-10-16T16:30:42+5:302023-10-16T16:31:19+5:30
Israel Hamas war: इस्राइल आणि पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना असलेल्या हमास यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. या दहा दिवसांमध्ये इस्राइलने भीषण हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या हमासच्या सहा टॉप कमांडरचा खात्मा केला आहे.
इस्राइल आणि पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना असलेल्या हमास यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. या दहा दिवसांमध्ये इस्राइलने भीषण हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या हमासच्या सहा टॉप कमांडरचा खात्मा केला आहे. ठार करण्यात आलेल्या कमांडरची माहिती देताना आयडीएफने सांगितले की, त्यांनी अली कादी याला ठार मारलं आहे. तो हमासच्या नुखबा जबल्या असॉल्ट कंपनीचा सदस्य होता. तसेच त्यांनी जाचारियाह अबू मामर याला ठार मारण्यात आले आहे. तो हमासच्या परराष्ट्र व्यवहारांचा प्रमुख होता.
त्याबरोबरच इस्राइली सैन्याने बिलाल अल कद्रा यालाही ठार मारलं आहे, तो नुखबा खान यूनिस असॉल्ट कंपनीचा कमांडर होता. त्याशिवाय इस्राइली फोर्सच्या एअरस्ट्राइकमध्ये मारला गेलेला हमासच्या चौथ्या कमांडरचं नाव मुमताज ईद आहे. तो हमासच्या दक्षिण डिस्ट्रिक्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटीचा कमांडर होता. ठार मारण्यात आलेल्या हमासच्या पाचव्या कमांडरचं नाव आहे जोयेद अबू. तो हमास सरकारचा वित्तमंत्री होता. या लढाईत मारला गेलेला सहावा कमांडर आहे मेराद अबू. तो हमासच्या हवाई विंगचा प्रमुख होता.
मिळालेल्या माहितीनुसार हमासच्या हवाई विंगचा कमांडर मेराद अबू याला ठार मारण्यासाठी इस्राइली सुरक्षा दलांनी एका मुख्यालयाला लक्ष्य केले. तिथून हमास आपल्या हवाई हालचालींवर नियंत्रण ठेवत असे. मेराद अबू याने गेल्या आठवड्यात हमासने इस्राइलमध्ये केलेल्या भयानक हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यात हमासच्या सैनिकांनी हँड ग्लायडर्सच्या मदतीने इस्राइलमध्ये प्रवेश केला होता.