हृदयद्रावक! गाझाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयाची रुग्णांना जिवंत ठेवण्यासाठी धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 10:05 AM2023-11-12T10:05:40+5:302023-11-12T10:12:07+5:30
Israel Palestine Conflict : गाझा पट्टीत इस्रायली सैन्य सातत्याने हल्ले करत आहे. पण या सगळ्यात गाझा पट्टीतील रुग्णालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
इस्रायली सैन्य हमासचा खात्मा करण्यासाठी गाझा पट्टीत आपली ग्राउंड ऑपरेशन चालवत आहे. मात्र या कारवाईमुळे गाझा पट्टीतील रुग्णालयांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना वाचवण्यासाठी आवश्यक औषधांचाही तुटवडा आहे. गाझा पट्टीत इस्रायली सैन्य सातत्याने हल्ले करत आहे. पण या सगळ्यात गाझा पट्टीतील रुग्णालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अशी अनेक रुग्णालये आहेत जिथे रुग्णांना जिवंत ठेवण्यासाठी खूप धडपड करावी लागत आहे.
इस्रायलने गाझा पट्टीच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलवर गोळीबार केल्याच्या वृत्ताचे ठामपणे खंडन केले आहे, परंतु त्यांचे सैन्य अल-शिफाजवळ हमासच्या कार्यकर्त्यांशी लढत असल्याचं म्हटलं आहे. सैन्याचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी टेलिव्हिजन ब्रीफिंगमध्ये सांगितलं की, "गेल्या काही तासांमध्ये, आम्ही अल-शिफा हॉस्पिटलला घेरलं आणि हल्ला करत आहोत अशी खोटी माहिती पसरवली गेली आहे. हे खोटे अहवाल आहेत."
पॅलेस्टिनी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन नवजात बालकांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता आणि विजेच्या कमतरतेमुळे इनक्यूबेटरमध्ये असलेल्यांना धोका आहे. हमासचा खात्मा करण्यासाठी इस्रायलचे लष्कर गेल्या अनेक दिवसांपासून गाझा पट्टीत जोरदार गोळीबार आणि बॉम्बफेक करत आहे. मदत संस्था आणि रुग्णालयातील कर्मचार्यांनी सांगितले आहे की परिस्थिती आधीच भयंकर आहे कारण औषधे आणि इंधनाची तीव्र कमतरता आहे.
इस्रायलने सांगितलं की, गाझामधून दक्षिण इस्रायलमध्ये अजूनही रॉकेट डागले जात आहेत, जिथे गेल्या महिन्यात हमासने सुमारे 1,200 लोक मारले आणि 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं की 7 ऑक्टोबरपासून गाझामधील 11,078 रहिवासी हवाई आणि रॉकेट हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत, त्यापैकी सुमारे 40 टक्के मुलं आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या देशाची गाझा पुन्हा ताब्यात घेण्याची कोणतीही योजना नाही. ते म्हणाले की, आम्हाला गाझावर राज्य करायचं नाही. आम्हाला ते ताब्यात घ्यायचं नाही, परंतु आम्हाला त्यांना एक चांगले भविष्य द्यायचं आहे. युद्धामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.