हमासकडून इस्रायलला अपमानास्पद वागणूक; 4 मृतदेहांच्या बदल्यात शेकडो कैद्यांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 19:20 IST2025-02-26T19:18:30+5:302025-02-26T19:20:15+5:30
Israel-Hamas War : आतापर्यंत 33 इस्रायली कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात 2000 हमास कैद्यांची सुटका करण्यात आली आहे.

हमासकडून इस्रायलला अपमानास्पद वागणूक; 4 मृतदेहांच्या बदल्यात शेकडो कैद्यांची सुटका
Israel-Hamas War : गेल्या दीड-दोन वर्षांपासून इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरू होते. या युद्धात सुमारे 46 हजार लोक मारले गेले, तर लाखो बेघर झाले. सध्या युद्धविराम लागू झाला असून, दोन्ही बाजूने कैद्यांची सुटका केली जात आहे. दरम्यान, इस्रायलला आपल्या कैद्यांच्या बदल्यात एक विचित्र करार करावा लागला आहे. दहशतवादी घटनांच्या आरोपाखाली अटक केलेल्या चार कैद्यांच्या मृतदेहांच्या बदल्यात इस्रायलला शेकडो कैद्यांची सुटका करावी लागणार आहे.
हा करार युद्धबंदीच्या पहिल्या फेरीच्या समाप्तीपूर्वी होणार आहे. इस्रायलने शनिवारपासून 600 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका पुढे ढकलली आहे. इस्रायलचे म्हणने आहे की, हमास आपल्यासोबत करत असलेला करार अतिशय क्रूर आहे. तर, हमासचे म्हणणे आहे की, इस्रायलकडून होणारा विलंब हे युद्धविरामाचे गंभीर उल्लंघन आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी न झाल्यास युद्धबंदीची दुसरी फेरी अवघड होईल.
हमासचे प्रवक्ते अब्दुल लतीफ अल-कानू याने सांगितले की, इस्रायलने 600 कैद्यांची सुटका केल्यावर दुसऱ्याच दिवशी ते 4 कैद्यांचे मृतदेह सुपूर्द करतील. खरं तर, सुरुवातीच्या टप्प्यात हमासने एका इस्रायलीच्या बदल्यात आपल्या 30 कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली होती. आता तो ही अट आणखी कडक करत आहे. चार मृतदेहांच्या बदल्यात शेकडो लोकांची सुटका करण्याची मागणी हमासकडून होत आहे.
दरम्यान, जेव्हा हमासने इस्रायली कैद्यांची सुटका केली, तेव्हा मोठ्या प्रमाणात जमाव जमवला गेला आणि इस्रायली कैद्यांना, त्या जमावाला अभिवादन करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे हा करार इस्रायलसाठी अपमानास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे. यामुळेच इस्रायलने आता कैद्यांची सुटका पुढे ढकलली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत 33 इस्रायली कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात 2000 हमास कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. बेंजामिन नेतन्याहू सरकारसाठी हा अत्यंत कठीण करार आहे.