इस्रायल-हमास युद्ध थांबलेच नाही! अमेरिकेच्या नाकावर टिच्चून गाझापट्टीवर हवाई हल्ला; १०० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 08:49 IST2025-03-18T08:49:24+5:302025-03-18T08:49:35+5:30
युद्धकाळात गाझापट्टी सोडून गेलेल्या व युद्धबंदीनंतर आनंदात परत आलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात १०० पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायल-हमास युद्ध थांबलेच नाही! अमेरिकेच्या नाकावर टिच्चून गाझापट्टीवर हवाई हल्ला; १०० जणांचा मृत्यू
अमेरिकेच्या मध्यस्थीने गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेले इस्रायल-हमास युद्ध थांबविण्यात आले होते. परंतू, सोमवारी रात्री इस्रायलने पुन्हा एकदा गाझा पट्टीवर मोठा हल्ला केला आहे. यामुळे युद्धकाळात गाझापट्टी सोडून गेलेल्या व युद्धबंदीनंतर आनंदात परत आलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात १०० पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलच्या सैन्याने एअरस्ट्राईक केला आहे. यामध्ये रॉकेटही या भागात डागण्यात आले. तसेच काहीही झाले तरी आपली सैन्याची कारवाई सुरुच राहणार असल्याचे इस्रायलने जाहीर केले आहे. यामुळे कसली युद्धबंदी अमेरिकेने केली असा सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाचे म्हणजे आज युक्रेन आणि रशियात अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धबंदी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलने मोठा हल्ला केल्याने अमेरिकेच्या मध्यस्थीवरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
इस्रायलच्या सैन्याने हमासच्या कमांडरना मारण्यासाठी तसेच त्यांचे दहशतवादी ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी हा हल्ला केला आहे. जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा आम्ही हल्ले करत राहू, या हवाई हल्ल्यांची व्याप्ती आम्ही आणखी वाढविणार आहोत, असेही इस्रायलने म्हटले आहे.
या हल्ल्यांनंतर हमासने युद्धविरामाच्या शर्तींचे उल्लंघन केले असल्याचा आरोप केला आहे. यामुळे आमच्याकडे जे अमेरिका आणि इस्रायली नागरिक ओलीस आहेत, त्यांचे भविष्य धोक्यात टाकले आहेस असा इशारा दिला आहे. युद्धबंदीनंतर समझोत्यानुसार हमासने काही नागरिकांना सोडले होते. परंतू, पुढच्या प्रक्रियेसाठी उर्वरित नागरिकांना सोडणार नसल्याचे म्हटले होते. यानंतर इस्रायलने हे हल्ले केले आहेत. या हल्ल्यात लहान मुलांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.