युद्धाचा ३९वा दिवस; हमास संसदेवर इस्रायलने केला कब्जा, आतापर्यंत ११ हजार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 09:26 AM2023-11-14T09:26:12+5:302023-11-14T09:27:00+5:30

Israel Hamas War: आतापर्यंत इस्रायलने हमासचे हजारो तळ उद्ध्वस्त केले आहेत.

israel hamas war idf soldiers share photo in conquered hamas parliament | युद्धाचा ३९वा दिवस; हमास संसदेवर इस्रायलने केला कब्जा, आतापर्यंत ११ हजार जणांचा मृत्यू

युद्धाचा ३९वा दिवस; हमास संसदेवर इस्रायलने केला कब्जा, आतापर्यंत ११ हजार जणांचा मृत्यू

Israel Hamas War: गाझापट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या ३९ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हमासने शेकडो जणांना ओलीस ठेवले असून, त्यांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. ओलिसांची सुटका होत नाही, तोपर्यंत युद्ध थांबणार नाही. माघार घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका इस्रायलने घेतली आहे. यातच हमासच्या संसदेवर इस्रायलने कब्जा केल्याची माहिती मिळाली आहे. 

हमासने इस्रायलवर हल्ले सुरू केले. यानंतर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर देत गाझामध्ये हमासचे कंबरडे मोडले. गाझातील बहुतांश भाग इस्रायली लष्कराने आपल्या ताब्यात घेतला आहे. इस्रायल सैनिकांनी गाझातील हमास संसदेवर नियंत्रण मिळवले आहे. इस्रायल लष्कराने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत इस्रायल सैनिक हमासच्या संसदेत आपला ध्वज फडकवताना दिसत आहेत. इस्रायल लष्कराचे सैनिक हमासच्या संसदेत अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. 

इस्रायलचे सैनिक योजनेनुसार काम करत आहेत 

इस्रायलचे सैनिक नियोजित योजनेनुसार काम करत आहेत. गुप्तचर माहितीचा वापर करून ते हमासचा अचूकपणे खात्मा करत आहेत. हवाई, सागरी आणि भूदल सैन्य समन्वयाने मोहिमा राबवत आहेत, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच हमासकडे इस्रायल सैन्याला रोखू शकणारी शक्ती नाही. इस्रायलचे सैन्य प्रत्येक टप्प्यावर प्रगती करत आहे. हमासने गाझावरील नियंत्रण गमावले आहे. हमासचे दहशतवादी दक्षिणेकडे पळून जात आहेत. नागरिकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असा दावाही संरक्षणमंत्र्यांनी केला आहे. 

दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला हमासने इस्रायलवर हल्ला केला. यामध्ये १४०० लोकांचा मृत्यू झाला. तर हमासने २४० लोकांना ओलीस ठेवले. यानंतर इस्रायलने गाझापट्टीतील हमासच्या ठिकाणांवर हल्लाबोल केला. गेल्या १५ दिवसांपासून इस्रायल लष्कराचे ग्राउंड ऑपरेशन सुरू आहे. इस्रायलने हमासचे हजारो तळ आणि बोगदेही नष्ट केले आहेत. यामध्ये आतापर्यंत ११ हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
 

Web Title: israel hamas war idf soldiers share photo in conquered hamas parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.