हृदयद्रावक! हमासच्या दहशतवाद्यांपासून लेकाचा जीव वाचवण्यासाठी आई-वडिलांनी झेलल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 10:00 AM2023-10-10T10:00:43+5:302023-10-10T10:02:54+5:30
Israel-Hamas conflict: हमासच्या दहशतवाद्यांपासून आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी पालकांनी आपला जीव गमावला आहे.
इस्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. यावेळी मन हेलावणारी घटना समोर आली आहे. हमासच्या दहशतवाद्यांपासून आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी पालकांनी आपला जीव गमावला आहे. इस्रायली मीडियानुसार, या युद्धात सुमारे 800 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 490 पॅलेस्टाईच्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्त्रायलचे रहिवासी डेबोरा आणि श्लोमी माटियास आणि त्यांचा 16 वर्षांचा मुलगा रोटेम माटियास हल्ल्याच्या वेळी घरात लपले होते. याच दरम्यान दहशतवादी घरात घुसले. कुटुंबातील सदस्य असलेले इलान ट्रोएन यांनी सांगितलं की, दहशतवादी दरवाजा तोडून घरात घुसले होते. त्यांनी रोटेमला लक्ष्य केलं. मुलाचा जीव वाचवण्यासाठी, डेबोरा आणि श्लोमी यांनी स्वत: गोळ्या झेलल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र यामध्ये रोटेमलाही गोळी लागली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इलान ट्रोएन ब्रँडीस युनिव्हर्सिटीमध्ये इस्रायली स्टडीजचे प्रोफेसर आहेत. याव्यतिरिक्त, ते शुस्टरमन सेंटर ऑफ इस्रायल स्टडीजचे संस्थापक संचालक देखील आहेत. ब्रँडीस विद्यापीठानेही या संदर्भात निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले की, प्रोफेसर ट्रोएन यांच्या कुटुंबासोबत एक दुःखद घटना घडली आहे. यामुळे आम्ही दु:खी आहोत. विद्यापीठाने हमासच्या दहशतवाद्यांचाही निषेध केला आहे.
इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी शनिवारी सांगितले की, गाझाबाबत कोणताही वाद नाही. आपण त्यांचा पराभव करू. आमच्याकडे युद्धाशिवाय पर्याय नाही. अनेक इस्रायली नागरिकांना हमासने ओलीस ठेवले आहे. आम्ही त्यांना हमासच्या तावडीतून नक्कीच मुक्त करू. इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हमासला इशारा दिला आहे की, कोणीही ओलीस ठेवण्याचे धाडस करू नये. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.