अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:19 AM2024-05-22T00:19:34+5:302024-05-22T00:20:21+5:30
Israel-Hamas war : गाझामध्ये हमासविरोधात युद्ध लढत असलेले इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. नेतन्याहू यांच्या अटकेसाठी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टामधून अटक वॉरंटची मागणी करण्यात आली आहे. त्याविरोधात संतप्त झालेल्या नेतन्याहू यांनी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाला इशारा दिला आहे.
गाझामध्ये हमासविरोधात युद्ध लढत असलेले इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. नेतन्याहू यांच्या अटकेसाठी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टामधून अटक वॉरंटची मागणी करण्यात आली आहे. त्याविरोधात संतप्त झालेल्या नेतन्याहू यांनी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाला इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, लोकशाहीवादी इस्राइलची तुलना हमासशी करण्याच्या कृत्याचा मी तीव्र विरोध करतो. तसेच नेतन्याहू यांनी त्यांच्या अटकेची करण्यात आलेली मागणी हा इस्राइली लष्कर आणि इस्राइलवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, आयसीसीमधील वकील करीम खान यांच्याकडून इस्राइलच्या लोकशाहीच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या नेत्यांविरोधात अटक वॉरंट काढण्याची केलेली मागणी ही अपमानजनक आहे. हा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयावर कायमस्वरूपी डाग लावणारा ठरेल. इस्राइल एक नरसंहार करणारी दहशतवादी संघटना हमासविरोधात युद्ध लढत आहे. हमासने नरसंहारानंतर ज्यू लोकांना ओलीस ठेवलं आहे.
तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टामध्ये वकील करीम खान यांनी पंतप्रधान नेतन्याहू यांच्यावर पॅलेस्टाइनी लोकांना उपाशी मारल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. तसेच गाझामध्ये युद्ध आमि मानवतेविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांसाठी संरक्षणमंत्री योव गेलेंट यांच्या अटकेचीही मागणी करण्यात आली होती. गाझामधील युद्धाल इस्राइलने भुकेला नागरिकांविरोधात हत्यारासारखं वापरलं आणि याचे आपल्याकडे पुरावे आहेत, असा दावा केला होता.