अल शिफा हॉस्पिटलच्या MRI विभागात हमासचे ऑपरेशन कमांड सेंटर; इस्रायलने दिले पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 09:28 AM2023-11-16T09:28:18+5:302023-11-16T09:28:52+5:30
Israel Hamas War: अल शिफा हॉस्पिटलचा वापर दहशवादी कारवायांसाठी केला जात होता, हे यावरून स्पष्ट होते, असे इस्रायकडून सांगण्यात आले आहे.
Israel Hamas War: हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर देत युद्ध आरंभिले. गाझापट्टीवर हल्ले करत इस्रायलने हमासचे कंबरडे मोडले. गेल्या ४० पेक्षा जास्त दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. गाझापट्टीतील अल शिफा रुग्णालयाच्या खाली हमासने आपले बंकर आणि शस्त्रास्त्र साठा करून ठेवल्याचा इस्रायलने दावा केला होता. याला अमेरिकेनेही पुष्टी दिली होती. यानंतर आता अल शिफा रुग्णालयाच्या एमआरआय विभागातून हमास आपले ऑपरेशन कमांड सेंटर चालवत आहे, असा पुन्हा एक दावा करताना यावेळी इस्रायलने याबाबतचे पुरावे दिल्याचे सांगितले जात आहे.
इस्रायली रणगाड्यांनी दोन-अडीच आठवड्यांपूर्वी उत्तर गाझात प्रवेश केला होता. त्यानंतर विविध ठिकाणी हल्ले करत ते थेट शिफा रुग्णालय परिसरात घुसले. शिफा रुग्णालय हे हमासचे सर्वात मोठे कमांड सेंटर असून तेथून ते दहशतवादी कृत्य करत असल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. त्यामुळे हमासला संपूर्ण नष्ट करण्यासाठी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे ५ जण मारले गेले
इस्रायलचे सैन्याने रुग्णालयात प्रवेश करताच त्यांना हमासने वापरलेली शस्त्रे आणि इतर लष्करी उपकरणे सापडली. इस्रायलच्या लष्कराची रुग्णालयाबाहेर हमासच्या सैनिकांशी चकमक झाली. यामध्ये ५ हमास जण मारले गेले. हमासने रुग्णालयाचा वापर लष्करी कारवायांसाठी केल्याचे ठोस पुरावे सापडले आहेत. इस्रायल सैन्याने अनेक दिवसांपासून शिफा रुग्णालयाला चारही बाजूंनी घेरले होते, अशी माहिती एका इस्रायल अधिकाऱ्याने दिली. अल शिफा रुग्णालयाच्या खाली हमासचे प्रमुख ऑपरेशन कमांड सेंटर आहे. हमासचे सैनिक रुग्ण, कर्मचारी आणि नागरिकांचा ढाल म्हणून वापर करतात, असा दावा इस्रायलाने सातत्याने केला आहे.
अल शिफा रुग्णालयात इस्रायलला काय काय मिळाले?
इस्रायल लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हेगारी यांनी सांगितले की, आम्हाला रुग्णालयात शस्त्रे, गुप्तचर साहित्य, लष्करी तंत्रज्ञान, उपकरणे सापडली आहेत. आम्हाला ऑपरेशनल मुख्यालय सापडले. येथे हमासने काही उपकरणे आणि हमास सैनिकांचे गणवेश ठेवले होते. याबाबतचे काही फोटो इस्रायलकडून जारी करण्यात आले आहेत. यावरून हे स्पष्टपणे सिद्ध होते की रुग्णालयाचा वापर दहशतवादासाठी करण्यात आला होता, जे आंतरराष्ट्रीय कायद्याचे पूर्ण उल्लंघन आहे, असे डॅनियल हेगारी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इस्रायल लष्कराने रुग्णालयाच्या आतून एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात अल शिफा रुग्णालयात सापडलेल्या तीन डफेल पिशव्या दिसत आहेत. हे एमआरआय लॅबच्या आसपास आढळून आले. प्रत्येक बॅगमध्ये रायफल, ग्रेनेड आणि हमासचा गणवेश होता. याशिवाय एका खोलीतून दारूगोळा आणि अनेक रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. एक लॅपटॉपही सापडला, तो जप्त करण्यात आला आहे.