हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 11:41 AM2024-10-19T11:41:48+5:302024-10-19T11:42:04+5:30
बुधवारी इस्रायली सैन्याची तुकडी ताल अल सुल्तान भागात गस्तीवर होती. यावेळी त्यांना तीन दहशतवादी दिसले. त्यांना पाहून रणगाड्यातून एक तोफ त्याच्या दिशेने डागण्यात आली.
इस्रायल-हमास युद्धात आता आणखी काही देश उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी सुरु झालेले युद्ध आता लेबनानपर्यंत पोहोचले आहे. अद्याप इराणने केलेल्या हल्ल्याला इस्रायलने प्रत्यूत्तर दिलेले नाही. या दोन देशांत युद्ध सुरु झाले तर जगभरात खळबळ उडणार आहे. इस्रायलने इराणमध्ये घुसून हमासच्या प्रमुखाला मारले होते. आता त्याची जागा घेणाऱ्या याह्या सिनवार यालाही यमसदनी धाडण्यात आले आहे.
सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला आहे. यात सिनवारच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली आहे. तसेच त्याची बोटे छाटण्यात आली आहेत. तसेच त्याचा दातही तोडण्यात आल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सिनवारच्या शरीरावर रणगाड्यांच्या तोफगोळ्यामुळे झालेल्या जखमाही आहेत.
बुधवारी इस्रायली सैन्याची तुकडी ताल अल सुल्तान भागात गस्तीवर होती. यावेळी त्यांना तीन दहशतवादी दिसले. त्यांना पाहून रणगाड्यातून एक तोफ त्याच्या दिशेने डागण्यात आली. नंतर चकमक सुरु झाली. यात तिघे दहशतवादी मारले गेले. त्यांचे चेहरे कपड्याने झाकलेले होते. यामुळे हा कपडा हटविण्यात आला, तेव्हा सिनवार सारखा दिसणारा यात होता. याची पुष्टी करण्यासाठी इस्रायली सैन्याने सिनवारचे बोट कापून इस्रायलला पाठविले. त्यापूर्वी दातांवरून पुष्टी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू, त्यातून काही समजले नाही. यामुळे सिनवारची बोटे कापून नेण्यात आली.
सिनवार जेव्हा तुरुंगात होता तेव्हा त्याचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. यामुळे डीएनए चाचणीद्वारे मारला गेलेला सिनावरच आहे हे समजण्यासाठी त्याचे बोट आणले गेले, असे इस्रायल नॅशनल सेंटर ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनचे प्रमुख चेन कुगेल यांनी सांगितल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
सिनवार त्या ठिकाणी आहे याची इस्रायल सैन्याला कल्पना नव्हती. तीन लोक एका घराच्या आडोशाने दुसऱ्या घराकडे पळताना दिसले होते. चकमकीत ते मारले गेले, असे इस्रायली सैन्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. सिनवार मृत झाल्याचे समजताच त्याचा मृतदेह इस्रायलला आणण्यात आला आहे. तसेच त्या भागाला घेरण्यात आले आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.