पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 07:28 PM2024-05-20T19:28:32+5:302024-05-20T19:29:01+5:30
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
Israel-Hamas War : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टा (ICC) युद्ध गुन्ह्यांसाठी त्यांच्याविरोधात अटका वॉरंट जारी करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे नेतन्याहूंसोबतच हमासच्या प्रमुख नेत्यांविरोधातही अटक वॉरंटची मागणी करण्यात आली आहे. आयसीसीचे मुख्य वकील करीम खान यांनी वॉरंटसाठी अर्ज केला आहे. त्यांनी हमास आणि नेतान्याहू यांच्यावर युद्ध गुन्ह्यांचे गंभीर आरोप केले आहेत.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय म्हणजेच ICC युद्धगुन्हे, मानवतेविरोधातील गुन्हे आणि नरसंहाराच्या आरोपाखाली अटक वॉरंट जारी करते. इस्रायलवर हमासने 7 ऑक्टोबर रोजी केलेला हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने केलेली कारवाई, हा युद्धगुन्हा म्हणून आयसीसी विचारात घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायलकडूनही असे घडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आता असे मानले जात आहे की, ICC लवकरच नेतान्याहू आणि हमास नेत्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी करू शकते.
इस्रायल आयसीसीचा सदस्य नाही
इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने इस्रायली पंतप्रधानांविरुद्ध अटक वॉरंट तयार केले तरी, इस्रायल त्याला मान्यता देणार नाही. याचे कारण म्हणजे, इस्रायल या आंतरराष्ट्रीय कोर्टाचा सदस्य नाही. मात्र, 2015 मध्ये पॅलेस्टिनी प्रदेशाचा या न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात समावेश करण्यात आला. इस्रायल-हमास युद्धाच्या सुरुवातीला आयसीसीच्या मुख्य अभियोक्त्याने म्हटले होते की, इस्रायलमध्ये हमास आणि गाझामध्ये इस्रायलकडून होत असलेल्या हल्ल्यांबाबत न्यायालयाचे अधिकार आहेत. गेल्या 7 महिन्यांपासून आयसीसी या युद्धगुन्ह्याची चौकशी करत आहे, जी आता पूर्णत्वास आली आहे.
गाझामध्ये कायद्यांचे उल्लंघन
गाझा पट्टीत मानवतावादी कायद्यांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीसीकडून ही कारवाई करण्यात येत असल्याचे मानले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेतन्याहू यांच्याशिवाय इतर अनेक वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले जाऊ शकते. याशिवाय हमासचे प्रमुख नेतेही आयसीसीच्या या वॉरंटच्या कक्षेत येऊ शकतात.