गाझामधील रुग्णालयावर आदळलेले रॉकेट आमचे नाही, तर..., इस्राइलने दाखवले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 02:07 PM2023-10-18T14:07:37+5:302023-10-18T14:07:44+5:30

Israel-Hamas war: काल गाझामधील एका रुग्णालयावर रॉकेट आदळून झालेल्या स्फोटात ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयावर आदळलेले रॉकेट हे इस्राइलने डागलेले होते, असा दावा करण्यात येत आहे. तसेच त्यावरून इस्राइलवर टीकाही होत आहे. मात्र इस्राइलने हा आरोप फेटाळून लावला आहे.

Israel-Hamas war: The rocket that hit a hospital in Gaza was not ours, but..., Israel shows evidence | गाझामधील रुग्णालयावर आदळलेले रॉकेट आमचे नाही, तर..., इस्राइलने दाखवले पुरावे

गाझामधील रुग्णालयावर आदळलेले रॉकेट आमचे नाही, तर..., इस्राइलने दाखवले पुरावे

इस्राइल आणि हमास यांच्यास सुरू असलेला भीषण संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही आहे. दरम्यान, काल गाझामधील एका रुग्णालयावर रॉकेट आदळून झालेल्या स्फोटात ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयावर आदळलेले रॉकेट हे इस्राइलने डागलेले होते, असा दावा करण्यात येत आहे. तसेच त्यावरून इस्राइलवर टीकाही होत आहे. मात्र इस्राइलने हा आरोप फेटाळून लावला आहे. इस्राइल डिफेन्स फोर्सेसचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितले की, इस्राइली सैन्याने गाझापट्टीमधील अल-अहली बॅपटिस्ट रुग्णालयावर हल्ला केलेला नाही. रुग्णालयावर आदळलेलं रॉकेट हे इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनेनं डागलेलं होतं, तसेच ते सोडताना मिसफायर झालं, असा दावा इस्राइलने केला आहे.

प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, परिचालन आणि गुप्तचर यंत्रणांचं अतिरिक्त परीक्षण केल्यानंतर आयडीएफने गाझामध्ये रुग्णालयावर हल्ला केलेला नाही हे स्पष्ट होत आहे, असे  इस्राइली सैन्याने सांगितले आहे. आयडीएफकडून प्रसारित करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये हगारी यांनी सांगितले की,  आयडीएफच्या ऑपरेशनल सिस्टिममधील विश्लेषणातून असे संकेत मिळतात की, गाझा येथील दहशतवाद्यांकडून रॉकेटचा मारा करण्यात आला. त्यातील काही रॉकेट अल अहली रुग्णालयाजवळून जात होती. गोपनीय माहितीमधून यामागे इस्लामिक जिहाद ही संघटना असल्याचे संकेत मिळत आहेत. हीच संघटना गाझामधील रुग्णालयावर झालेल्या अयशस्वी हल्ल्यासाठी जबाबदार आहे.

दरम्यान, इस्राइली वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार  हमास आणि बहुतांश अरब देशांनी या स्फोटासाठी इस्राइलला जबाबदार धरले आहे. हमास या दहशतवादी संघटनेने सांगितले की, यामध्ये आमचे सुमारे ५०० नागरिक मारले गेले आहेत. तर गाझामध्ये हमासकडून चालवण्यात येणाऱ्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, २०० ते ३०० लोक मारले गेले होते.

इस्राइली सैन्याने सांगितले की, गाझामधील दहशतवादी संघटना ह्या इस्राइलच्या दिशेने अंधाधुंद रॉकेट डागतात. ७ ऑक्टोबरला युद्धाला तोंड फुटल्यापासून इस्राइलच्या दिशेने डागण्यात आलेल्या रॉकेटपैकी सुमारे ४५० रॉकेट गाझामध्येच कोसळली आहेत. त्यामुळे गाझामधील रहिवाशांचं जीवन संकटात सापडलं आहे.

द टाइम्स ऑफ इस्राइलच्या रिपोर्टमध्य सांगितलंय की, देखरेख ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये गाझापट्टीमधून लाँच केलेलं रॉकेट मिसफायर होऊन पॅलेस्टाइनच्या क्षेत्रातच स्फोट होताना दिसत आहे. इतर अनेक व्हिडीओंमध्येही हेच दिसत आहे. 

Web Title: Israel-Hamas war: The rocket that hit a hospital in Gaza was not ours, but..., Israel shows evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.