...तर जगभरातील मुस्लिम इस्राइलला चोख प्रत्युत्तर देतील, खोमेनींची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 07:34 PM2023-10-17T19:34:05+5:302023-10-17T19:34:48+5:30
Israel-Hamas war: हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर इस्राइलने हमासविरोधात युद्ध पुकारत गाझापट्टीमध्ये हल्ले सुरू केले आहेत. हे हल्ले थांबवण्यासाठी इराणकडून इस्राइलला इशारे देण्यात येत आहेत.
हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर इस्राइलने हमासविरोधात युद्ध पुकारत गाझापट्टीमध्ये हल्ले सुरू केले आहेत. हे हल्ले थांबवण्यासाठी इराणकडून इस्राइलला इशारे देण्यात येत आहेत. यादरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी इस्राइलला दिलेल्या धमकीची जगभरात चर्चा सुरू आहे. जर पॅलेस्टाइनींवरील इस्राइलचं आक्रमण सुरू राहिलं, तर जगातील कुठलीही शक्ती मुस्लिमानां इस्राइलविरोधात लढण्यापासून रोखू शकत नाही, अशी धमकी खोमेनी यांनी दिली आहे.
इराणची राजधानी तेहरानमध्ये मंगळवारी विद्यार्थ्यांच्या एका समुहाला संबोधित करताना खोमेनी यांनी सांगितले की, इस्राइलकडून पॅलेस्टाइनींवर होत असलेल्या अन्यायाला आपण पाहत आहोत. जर पॅलेस्टाइनींवरील इस्राइलचं आक्रमण सुरू राहिलं तर जगातील कुठलीही ताकद मुस्लिमांना त्यांच्याविरोधात लढण्यापासून रोखू शकणार नाही. खोमेनी यांनी बदल्याच्या कारवाईचे संकेत देताना सांगितले की, जगभरातील मुस्लिमांना आणि प्रतिरोधक शक्तींना कुणीही रोखू शकणार नाही. प्रतिरोधक शक्तीसुद्धा प्रत्युत्तर देतील. त्यामुळे इस्राइलने आता थांबलं पाहिजे.
दरम्यान, इस्राइलचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहिमयन यांनी संघर्ष वाढवणयाचा इशारा दिला होता. अब्दुल्लाहियन यांनी सांगितले की, प्रतिरोध मोर्चा येणाऱ्या काळामध्ये कारवाई करू शकतो. प्रतिरोध मोर्चा या क्षेत्रातील सैन्यांची एक आघाडी आहे. त्यामध्ये इराण समर्थित शक्तिशाली लेबनानी समूह हिजबुल्लाहचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यामध्ये हिजबुल्लाह आणि इस्राइली सैन्यादरम्यान लेबेनॉन-इस्राइल सीमेवर गोळीबार झाला होता. त्यामुळे हिजबुल्लाह या युद्धात आणखी एक आघाडी उघडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.