इस्रायलवर आता तिहेरी संकट: हमास आणि हिजबुल्लाहनंतर 'हूती'ने केली युद्धाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 04:02 PM2023-11-01T16:02:10+5:302023-11-01T16:02:25+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात हूती संघटनेची एन्ट्री झाली आहे.

Israel Hamas War: Triple Crisis on Israel Now: After Hamas and Hezbollah, 'Houthi' Declares War | इस्रायलवर आता तिहेरी संकट: हमास आणि हिजबुल्लाहनंतर 'हूती'ने केली युद्धाची घोषणा

इस्रायलवर आता तिहेरी संकट: हमास आणि हिजबुल्लाहनंतर 'हूती'ने केली युद्धाची घोषणा

Israel Hamas War: गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि हमास, यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात हमास व्यतिरिक्त लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहदेखील इस्रायली सैन्यावर हल्ले करत आहे. आता या युद्धात आणखी एका संघटनेची एन्ट्री झाली आहे. येमेनची अतिरेकी संघटना हूतीने अधिकृतपणे इस्रायलविरुद्ध पॅलेस्टाईनच्या बाजूने युद्धाची घोषणा केली आहे. 

लवकरच गाझामध्ये युद्धविराम न झाल्यास इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्याची धमकी हूती बंडखोरांनी दिली आहे. विशेष म्हणजे, 2014 मध्ये हूतीने येमेनच्या राजधानीसह देशाचा मोठा भाग ताब्यात घेतला. दरम्यान, सोमवारी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवर येमेनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी केल्याचा आरोप केला.

हूती बंडखोर कोण आहेत?
1980 च्या दशकात येमेनमध्ये हुतींचा उदय झाला. शिया मुस्लिमांची ही सर्वात मोठी आदिवासी संघटना आहे. अब्दुल्ला सालेहच्या आर्थिक धोरणांमुळे हूतींना राग आला, ज्यामुळे येमेनच्या उत्तरेकडील प्रदेशात अराजगता वाढली आणि सन 2000 मध्ये हूतींनी सैन्य तयार केले. अब्दुल्ला सालेहच्या सैन्याने 2004 ते 2010 दरम्यान हूतींसोबत 6 युद्धे लढली. 2011 मध्ये अरबांच्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध थांबले आणि सुमारे दोन वर्षे चर्चा सुरू राहिली. पण तोडगा निघाला नाही.

यानंतर, हूतींनी सौदी अरेबिया समर्थित नेते अहमद रब्बो मन्सूर हादी यांना सत्तेवरून हटवले आणि येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली. हूतीकडे असलेले सैनिक टँक, अँटी-टँक क्षेपणास्त्रे, लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि अगदी तांत्रिक वाहने चालविण्यास सक्षम आहेत. गेल्या गुरुवारी हूतीने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले, मात्र इस्रायलने हा हल्ला परतून लावला. आता हूतीने युद्धाची घोषणा केली आहे, त्यामुळे युद्ध आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Israel Hamas War: Triple Crisis on Israel Now: After Hamas and Hezbollah, 'Houthi' Declares War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.