भयावह! गाझामध्ये 100 लोक वापरतात 1 टॉयलेट; दिवसभरात मिळतं फक्त 1 लीटर पिण्याचं पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 04:01 PM2023-10-17T16:01:23+5:302023-10-17T16:02:46+5:30
Israel Palestine Conflict : गाझामध्ये 11,000 लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी निम्म्याहून अधिक महिला आणि लहान मुलं आहेत.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दहा हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. मात्र गाझामध्ये परिस्थिती इतकी बिकट आहे की जवळपास 100 लोकांना एकच टॉयलेट वापरण्यासाठी आहे. तसेच दिवसभरात फक्त 1 लीटर पिण्याचं पाणी मिळतं.
पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी काम करणाऱ्या युनायटेड नेशन्स एजन्सीच्या कम्युनिकेशन डायरेक्टर ज्युलिएट टॉमा यांनी बीबीसी रेडिओ 4 ला दिलेल्या माहितीनुसार, शेकडो लोक एकाच टॉयलेटचा वापर करत आहेत. आमच्या कर्मचाऱ्यांना पिण्याचं पाणी मिळत नाही. ते दिवसातून फक्त 1 लिटर पाणी पित आहेत. तसेच गाझामधील सर्व रुग्णालयांमध्ये फक्त 24 तासांचं इंधन आता शिल्लक आहे.
इस्रायली आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एक अपडेट जारी करून माहिती दिली की, युद्धाच्या सुरुवातीपासून 344 जखमी लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत, त्यापैकी 82 गंभीर प्रकृतीत आहेत, 194 मध्यम स्थितीत आहेत आणि 68 सामान्य स्थितीत आहेत. हमाससोबत युद्ध सुरू झाल्यापासून 4,229 इस्रायली जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गाझामध्ये 11,000 लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी निम्म्याहून अधिक महिला आणि लहान मुलं आहेत. गाझामध्ये 115 मेडिकल सेंटरवर हल्ला करण्यात आल्याचं संघटनेने म्हटलं आहे. 7 ऑक्टोबरपासून गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात 2,800 हून अधिक लोक मारले गेले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.