"गाझावरील हल्ले थांबवले नाहीत तर...", आता इराणची इस्रायलला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:55 PM2023-10-17T23:55:54+5:302023-10-17T23:57:47+5:30
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनीही इस्रायलने गाझावरील हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणने खुले आव्हान दिले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियन यांनी गाझा पट्टीवर बॉम्बफेक थांबवली नाही तर त्याचे परिणाम इस्रायलला भोगावे लागतील, असे म्हटले आहे. तसेच, गाझावरील इस्रायलचा हल्ला आम्ही खपवून घेणार नाही. सर्व पर्याय खुले आहेत आणि आम्ही गाझाच्या लोकांविरुद्ध केलेल्या युद्धगुन्ह्यांकडे डोळेझाक करू शकत नाही. आम्ही इस्रायलशी दीर्घकालीन युद्ध करण्यास सक्षम आहोत, असेही हुसेन अमीर अब्दुल्लाहियन म्हणाले.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनीही इस्रायलने गाझावरील हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. गाझामध्ये इस्रायलचे हल्ले असेच सुरू राहिले तर जगभरातील मुस्लिमांना आणि इराणच्या प्रतिकार शक्तींना कोणीही रोखू शकणार नाही, असे अयातुल्ला अली खामेनेई यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी सांगितले की, आम्ही युद्ध सुरू केले नाही. त्यांनी आम्हाला लढण्यास भाग पाडले. हमासविरुद्धच्या या युद्धात आंतरराष्ट्रीय समुदाय आमची साथ देईल, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आदर करतो.
If Zionist regime’s crimes continue, resistance forces cannot be stopped#PalestineGenocidepic.twitter.com/zL2FetZitg
— Khamenei Media (@Khamenei_m) October 17, 2023
दरम्यान, इराणचे नेते 1979 च्या इस्लामिक क्रांतीपासून पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहेत. खरंतर, तेहरान पॅलेस्टाईनच्या इस्लामिक गट हमासला आर्थिक आणि लष्करी मदत करत आहे. तर आता इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. हमास आणि इस्रायलमधील युद्ध 11 व्या दिवशीही सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला होता, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 4200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हमासचा वरिष्ठ कमांडर ठार
इस्त्रायल सध्या दोन आघाड्यांवर युद्ध लढत आहे. एकीकडे ते गाझा पट्टीतून हमासच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. दुसरीकडे, हिजबुल्लाहचे दहशतवादी लेबनॉनमधून हल्ले करत आहेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल हवाई हल्ले करत आहे. आता इस्रायली लष्कराने हमास कमांडर मारला गेल्याचे म्हटले आहे. इस्रायली सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात अयमान नोफल (Ayman Nofal) ठार झाला आहे. तो हमासचा वरिष्ठ कमांडर असल्याचे सांगितले जाते. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, अयमान हा हमासच्या जनरल मिलिटरी कौन्सिलचा सदस्य होता. याशिवाय, इस्रायली लष्कराने दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या दोन दहशतवाद्यांनाही ठार केले आहे.